मुंबई : राज्याच्या न्यायिक क्षेत्रात ऐतिहासिक घडामोड घडली असून, आता मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथेही बसणार आहे. १८ ऑगस्ट २०२५ पासून या निर्णयाची अमलबजावणी होणार असून, यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना न्यायासाठी मुंबई किंवा औरंगाबादपर्यंत प्रवास करावा लागणार नाही.
राज्य पुनर्रचना अधिनियम, १९५६ च्या कलम ५१ (३) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करत, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या मंजुरीनंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांनी हा आदेश जारी केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील विभागातून १ ऑगस्ट २०२५ रोजी अधिकृत आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. दीर्घ काळापासून कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याची मागणी सुरु होती. आता ती पूर्ण होत असून, यामुळे प्रलंबित खटल्यांचे निपटारेही अधिक गतिमान होतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.