Published On : Mon, Jan 27th, 2020

नागपूर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी : बॉम्बशोधक व नाशक पथक तैनात

नागपूर : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रेल्वेस्थानकावर आरपीएफ, लोहमार्ग पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच श्वान पथक तैनात करण्यात आले आहे. याशिवाय कुली आणि ऑटोचालकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नागपूर रेल्वेस्थानक हे देशातील संवेदनशील रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. प्लॅटफार्म क्रमांक १ ते ८ पर्यंत कसून तपासणी करण्यात येत आहे. पूर्व आणि पश्चिम प्रवेशद्वारावर बंदुकधारी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. संशयितांची कसून तपासणी करण्यात येत आहे. प्रवाशांच्या बॅगची स्कॅनरमधुन तपासणी केल्यावरच त्यांना आत प्रवेश देण्यात येत आहे

दिल्ली आणि मुंबईकडून येणाऱ्या रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. आरपीएफ जवान प्रतीक्षालय, तिकीट केंद्र आणि पार्किंग परिसरात लक्ष ठेवून आहेत. बेवारस वस्तू दिसल्यास त्वरित कळविण्याचे आवाहन प्रवाशांना ध्वनिक्षेपकाच्या साहाय्याने करण्यात येत आहे.

शनिवारी दुपारी आरपीएफच्या निरीक्षकांनी कुली, ऑटोचालकांची बैठक घेऊन त्यांना संशयित व्यक्तींची माहिती देण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय सीसीटीव्हीच्या माध्यमातून रेल्वेस्थानकाच्या कानाकोपऱ्यातील माहिती घेण्यात येत आहे.