गुवाहाटी (आसाम) :आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा आणि भाजप नेते राम माधव यांनी मणिपूरमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी जहालवाद्यांची मदत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. मणिपूरमधील एका उग्रवादी गटाच्या नेत्याने 2019 मध्ये लिहिलेल्या पत्रातून यासंदर्भात माहिती समोर आली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा आणि भाजपचे जेष्ठ नेते राम माधव यांनी निवडणुकीपूर्वी उग्रवाद्यांसोबत गुप्त बैठक घेतली होती. या बैठकीत भाजप आणि उग्रवाद्यांमध्ये सामंजस्य करार झाला होता. या करारात जहालवादी संघटना भाजपला निवडणुका जिंकण्यासाठी मदत करतील, असे म्हटले होते. युनायटेड कुकी लिबरेशन फ्रंटचे अध्यक्ष एसएस हाओकीप यांनी हे पत्र लिहिले आहे. हे पत्र त्यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा भाग आहे. हे पत्र त्यांनी 2019 मध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिले होते.
दहशतवादी गटाच्या नेत्याने पत्रात म्हटले आहे की, भाजपचे एन बिरेन सिंह 2017 मध्ये कुकी जहालवाद्यांच्या मदतीने मणिपूरचे मुख्यमंत्री झाले. मणिपूरमधील कुकी बंडखोर गटाच्या नेत्याने 2019 मध्ये एका पत्राद्वारे गृहमंत्री अमित शहा यांना या घटनेची माहिती दिली होती. युनायटेड कुकी लिबरेशन फ्रंटचे अध्यक्ष एसएस हाओकीप यांनी न्यायालयात दाखल केलेल्या
प्रतिज्ञापत्रासोबत हे स्फोटक पत्र जोडले आहे. एसएस हाओकीप यांना एनआयएने 2018 मध्ये अटक केली होती.
मणिपूरमध्ये भाजपचे सरकार बनवण्यात आमची महत्त्वाची भूमिका असल्याचा दावा या नेत्याने पत्राद्वारे केला आहे. आमच्या पाठिंब्याशिवाय भाजपला मणिपूरमध्ये सरकार स्थापन करणे अशक्य झाले असते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही आमच्या भागात भाजपला 80-90 टक्के मते मिळाली, असा धक्कादायक खुलासा पत्रात करण्यात आला आहे.