नागपूर : शहरात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदी नाले तुडूंब भरून वाहत आहेत. मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थिती बघता २२ जुलै २०२४ रोजी जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालये बंद राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. तसेच नागपूर जिल्हयात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
सोमवारी, २२ जुलै रोजीही पावसाचा धोका वर्तविण्यात आला आहे. पुन्हा विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला असून शाळांनाही तसे कळविण्यात आले आहे. शनिवारी आलेल्या मुसळधार पावसाच्या वेळी उशिरा सुट्टी जाहीर केल्याने विद्यार्थ्यांची आणि शाळांची मोठी गैरसोय झाली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.










