कोल्हापूरात मुसळधार पाऊस, महापुराचा धोका? 75 बंधारे पाण्याखाली, 13 प्रमुख मार्ग बंद
कोल्हापूर: कोल्हापूर शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. या सततच्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलाय. याचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख तेरा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून कोल्हापूर-सिंधुदुर्ग मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
कोल्हापूरातील पंचगंगा नदीन धोक्याची पातळी गाठल्याची माहिती आहे. तर गगनबावडा-कळे मार्गावर पाणी साचल्याने त्या मार्गावर पाच खाजगी बसेस अडकल्याचं सांगितलं जात आहे. रात्रीपासून इथे काही बसेसमध्ये जवळपास 250 ते 300 प्रवासी असल्याची माहिती मिळते आहे. हे सगळे प्रवासी सध्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.
इतकेच नाहीतर पावसाचा तडाखा इतका मोठा आहे की, 129 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 39 फुटापर्यंत पोहचली आहे. जर पंचगंगा नदीची पाणीपातळी आणखी 7 इंचाने वाढली तर कोल्हापुरात महापूर येण्याची भीती वर्तविली जाते आहे.
दरम्यान, गुरूवारी रात्रीपासून कोल्हापुर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. गगनबावडा-कळे मार्गावर तसंच इतर भागात सगळीकडे पाणी साचल्याने बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाजूच्या कळेगावाची मदत घ्यावी लागणार आहे.