नागपूर : यंदा गणेश विसर्जनाच्या काळात शहरातील एकूण ३४ ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. यानिमित्ताने सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त डॉ सिंगल यांच्या नेतृत्वाखाली 2,600 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून त्यात तीन अतिरिक्त आयुक्त, 10 उपायुक्त, 70 पोलीस निरीक्षक, 325 एपीआय आणि पीएसआय, 1,200 होमगार्ड आणि एसआरपीची एक पथक बंदोबस्त पहाणार आहे.
विसर्जनासाठी कोराडी आणि फुटाळा तलाव मार्गावर 30 अधिकारी आणि 600 कर्मचाऱ्यांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्यांची सुरक्षा व्यवस्थेवर करडी नजर राहणार आहे. छेडछाडीच्या घटनांना आळा बसावा यासाठी महिला पोलिसही तैनात करण्यात आले आहेत.
मोठ्या गणेश मंडळांना स्वयंसेवक तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, विसर्जनाच्या वेळी मद्यपान किंवा अन्य नशा करणाऱ्यांना सहभागी न होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आक्षेपार्ह कृत्यांवर कडक कारवाईचे निर्देश पोलिस आयुक्तांनी दिले आहे.
गणेश विसर्जन शांततेत व सुरक्षितपणे पार पडावे, यासाठी नागरिकांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ.सिंगल यांनी केले आहे.