
नागपूर -शहरात वाढत्या तापमानाने नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. केवळ माणसेच नव्हे, तर आता यंत्रणाही उष्णतेमुळे हैराण झाल्याचे चित्र दिसत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाने सर्व विक्रम मोडले असून उकाड्यामुळे लू आणि हीटस्ट्रोकसारख्या आजारांचा धोका वाढला आहे.
दरम्यान, वाढत्या उष्णतेचा फटका वीज यंत्रणेलाही बसू लागला आहे. तीव्र तापमानामुळे वीजेचे ट्रान्सफॉर्मर ओव्हरहीट होत असून ते फुटण्याचा किंवा निकामी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
ही परिस्थिती लक्षात घेता वीज विभागाने अनोखा उपाय अवलंबला आहे. ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी आता त्यांच्यावर कूलर बसवण्यात येत आहेत. या उपायामुळे ट्रान्सफॉर्मरचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होत असून उन्हाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
एकीकडे नागरिक उकाड्याने त्रस्त असताना, दुसरीकडे वीज यंत्रणेसमोरही मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे येत्या काळात उष्णतेचा परिणाम आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








