Published On : Wed, Apr 29th, 2026
By Nagpur Today Nagpur News

राज्यात उष्णतेचा कहर:नागपुरात १० दिवसांत १५ जणांचा मृत्यू,उष्माघाताचा वाढता धोका!

Advertisement

नागपूर : राज्यभर तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढत असून उष्णतेच्या लाटेने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. विशेषतः विदर्भासह अनेक भागांमध्ये उष्म्याचा तडाखा तीव्र झाला असून गेल्या दहा दिवसांत नागपुरातच तब्बल १५ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक नोंद समोर आली आहे.

उन्हाळ्याच्या वाढत्या झळांमुळे उष्णतेशी संबंधित आजारांमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. प्रचंड घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होते. परिणामी थकवा, अशक्तपणा, झोपेच्या समस्या, भूक मंदावणे, डोळ्यांची व हातापायांची जळजळ, मळमळ आणि उलट्या यांसारखी लक्षणे प्रकर्षाने जाणवू लागतात.

Gold Rate
Apr 29- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,50,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,000 /-
Silver/Kg ₹ 2,42,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्वचेवरही परिणाम-
उष्णतेचा परिणाम त्वचेवरही दिसून येतो. घामाच्या प्रमाणात वाढ झाल्याने शरीरावर लालसरपणा, खाज, पुरळ किंवा लहान फोड येण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. दुर्लक्ष केल्यास संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो.

‘ओआरएस’चा उपयोग महत्त्वाचा-
घामामुळे शरीरातून पाणीबरोबरच क्षारही कमी होतात. त्यामुळे केवळ पाणी पिणे पुरेसे नसून ‘ओआरएस’सारख्या द्रावणाचा वापर फायदेशीर ठरतो. उष्माघाताची तीव्रता वाढल्यास गोंधळल्यासारखे वाटणे, स्नायूंमध्ये आकडी येणे, बोलण्यात अस्पष्टता अशी गंभीर लक्षणेही दिसू शकतात.

सहआजार असणाऱ्यांनी घ्यावी विशेष काळजी
उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारखे आजार असलेल्या रुग्णांनी औषधे वेळेवर घेणे अत्यावश्यक आहे. भूक नसल्यामुळे औषधे टाळल्यास प्रकृती अधिक बिघडू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

विदर्भात तापमानाचा उच्चांक-
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले गेले. अकोला आणि अमरावती येथे ४५.२ अंश, वर्ध्यात ४५ अंश, तर नागपूरमध्ये ४४.४ अंशांपर्यंत तापमान पोहोचले. गेल्या २४ तासांत किंचित घट झाली असली तरी उष्णतेचा तीव्रपणा कायम आहे.

उष्माघाताची प्रमुख लक्षणे-
चक्कर येणे, तोल जाणे
शरीराचे तापमान वाढणे
पोटदुखी, मुरडा येणे
पाण्याची कमतरता
शुद्ध हरपणे

तज्ज्ञांचा सल्ला-
दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर जाणे टाळावे. सैल, हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावेत. छत्री, टोपी किंवा स्कार्फचा वापर करावा. नियमित अंतराने पाणी प्यावे. तिखट, तेलकट व शिळे अन्न टाळावे. तसेच फळे, सुकामेवा यांचा आहारात समावेश करणे अधिक फायदेशीर ठरते.
उष्णतेच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट होत आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement