Published On : Fri, May 1st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात हृदयद्रावक घटना: आई-मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, सुसाइड नोटमुळे गूढ वाढले

Advertisement

नागपूर : शहरातील नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या वेंकटेश नगर परिसरात शुक्रवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली. आई आणि मुलीने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली असून मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी दोन वेगवेगळे सुसाइड नोट जप्त केले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मृतांची ओळख ५२ वर्षीय संगीता ढबाले आणि त्यांची २९ वर्षीय मुलगी आकांक्षा ब्रह्मे अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगीता यांच्या पतीचे सुमारे १० वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली होती. तर आकांक्षा पूर्वी एका बँकेत कार्यरत होती, मात्र काही काळापूर्वी तिने नोकरी सोडली होती.

आकांक्षाचे दोन वर्षांपूर्वी लोकेश नावाच्या अभियंत्यासोबत लग्न झाले होते. दोन महिन्यांपूर्वी तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ती आईसोबत वेंकटेश नगर येथील घरी राहत होती.

सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री लोकेश सासरी आला होता. त्यावेळी काही कारणावरून वाद झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर तो परत गेला. शुक्रवारी सकाळी आकांक्षा फोन उचलत नसल्याने तो पुन्हा घरी आला असता, खिडकीतून डोकावून पाहिले असता दोघींचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. घटनास्थळावर सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये संगीता यांनी स्वतःच्या इच्छेने आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे. तर आकांक्षाने आपल्या शेवटच्या इच्छेमध्ये तिचा मृतदेह सासरच्या ताब्यात देऊ नये आणि वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणीच अंत्यसंस्कार करावेत, असे लिहिले आहे.

Advertisement

दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांनी आकांक्षाच्या पती आणि सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. मालमत्तेच्या वादातून दोघींना सतत मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांकडून या घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून, सत्य समोर आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.