Published On : Fri, Nov 18th, 2022

स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध स्पर्धासंदर्भात मुख्याध्यापकांची कार्यशाळा शनिवारी

Advertisement

नागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागपूर महागरपालिकेने स्वच्छता विषयक विविध स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर असून, स्पर्धेत नागपूर शहरातील सर्व नागरिक सहभागी होऊ शकतील. स्पर्धेची संपूर्ण माहिती शालेय विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचावी याकरिता मनपा घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे मनपा क्षेत्रातील सर्व शाळांकरिता शनिवार, १९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत रेशीमबाग येथील कविवर्य सुरेशभट सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत सर्व मुख्याध्यापक यांनी उपस्थित राहणे अनिवार्य असल्याची माहिती मनपाचे शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर यांनी दिली.

राजेंद्र पुसेकर म्हणाले की, स्पर्धेची संपूर्ण माहिती आणि स्पर्धेमध्ये मनपा शाळेतील विदयार्थ्यांना व त्यांच्या पालकांना सहभागी होण्याकरीता पालकसभा घेऊन जनजागृती करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय कार्यालयाकरिता स्वच्छ निमशासकीय/ शासकीय ऑफीस/बॅक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच स्वच्छ शाळा स्पर्धा घेण्यात येणार असून या स्पर्धेमध्ये मनपाच्या सर्व शाळांनी सहभागी होणे अनिवार्य आहे. याकरिता शाळा, वर्गखोल्या, कार्यालय, परिसर स्वच्छ व निटनेटका ठेवावा.

तसेच सर्व शिक्षकांनी ‘स्वच्छता अॅप डाऊनलोड करावा. याकरीता घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे आपल्या शाळेची तपासणी करण्यात येऊन गुणांकन करण्यात येईल व प्रभाग निहाय ३ शाळांना पुरस्कार देण्यात येणार आहे. याशिवाय कार्यशाळेत स्वच्छ भारत अभियानांतर्गत पथनाट्य स्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धा, जिंगल स्पर्धा, लघुपट स्पर्धा, रेखाचित्र/पोस्टर स्पर्धा, स्वच्छ चॅम्पियन्स स्पर्धा या सर्व स्पर्धाबाबत माहिती देण्यात येणार आहे.