Published On : Tue, Feb 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा छळ; जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी डॉ. समीर पालतेवारविरोधात गुन्हा दाखल!

Advertisement

नागपूर : रामदासपेठ येथील मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरला जातीवाचक शब्दांत अपमानित करत नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सीताबर्डी पोलिस ठाण्यात डॉ. समीर नारायण पालतेवार यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी कोण?
फिर्यादी पुनम अंकुशराव डुकरे (वय 32) या मेडिट्रिना हॉस्पिटल व मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये सहाय्यक फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत. आरोपी डॉक्टरांना त्यांच्या जातीची माहिती मिळाल्यानंतर काही काळापासून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.

Gold Rate
03 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,51,300 /-
Gold 22 KT ₹ 1,40,700 /-
Silver/Kg ₹ 2,62 600 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नेमकं काय घडलं?
तक्रारीनुसार, 31 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या लोखंडी गेटजवळ डॉ. पालतेवार यांनी फिर्यादीला सार्वजनिक ठिकाणी अश्लील व जातीवाचक शब्द वापरून अपमानित केले. “तुझी लायकी काय आहे? हॉस्पिटलमध्ये येण्याची हिंमत कशी झाली?” अशा शब्दांत धमकी देत नोकरीवरून काढून टाकण्याची भाषा वापरण्यात आली, असा आरोप आहे. या घटनेवेळी हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकही उपस्थित होते.

या प्रकारामुळे घाबरलेल्या फिर्यादीने तात्काळ डायल 112 वर संपर्क साधला, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढे सीताबर्डी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी आरोपीविरोधात BNS 2023 अंतर्गत कलम 296, 351(2) तसेच SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. FIR क्रमांक 0060/2026 असून तपास सुरू करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग मोहनलाल राजपूत करत आहेत.

आरोपीचा वादग्रस्त भूतकाळ-
डॉ. समीर पालतेवार हे मेडिट्रिना हॉस्पिटलचे संस्थापक व नामांकित न्यूरोसर्जन म्हणून ओळखले जातात. मात्र याआधीही ते वादात सापडले आहेत.

मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये सुमारे 18 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी त्यांच्यासह पत्नी सोनाली पालतेवार आणि इतर 18 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. हॉस्पिटलचे भागीदार गणेश रामचंद्र चक्करवार यांनी यासंदर्भात तक्रार दिली होती.

तक्रारीनुसार, डिजिटल मार्केटिंग व जाहिरातींच्या नावाखाली बनावट बिले तयार करून कोट्यवधी रुपयांची रक्कम कंपनीच्या खात्यातून काढण्यात आल्याचा आरोप आहे. विविध व्यक्ती व कंपन्यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणावर पैसे वर्ग केल्याचेही तपासात समोर आले होते.
याशिवाय, 2019 आणि 2021 मध्येही डॉ. पालतेवार यांच्याविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते. राजीव गांधी जीवनदायी योजनेतील रुग्णांकडून अतिरिक्त पैसे घेणे तसेच कोविड काळात जादा बिले आकारल्याचे आरोपही त्यांच्यावर झाले होते.

गंभीर प्रश्न उपस्थित-
नव्या अत्याचाराच्या गुन्ह्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील महिलांची सुरक्षितता, कामाच्या ठिकाणी होणारा जातीआधारित छळ आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी याबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement