नागपूर:देशभरात महाशिवरात्री उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. महाराष्ट्रासह नागपुरातही ठिकठिकाणी भाविकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे.शहरातील मोक्षधासह अनेक शिवमंदिरात भक्तांची गर्दी उसळली आहे. मंदिराबाहेर दर्शनासाठी भाविकांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. चार योग एकत्र आल्याने आजच्या महाशिवरात्रीला कपिलाषष्ठीचा योग आहे.आरती, भजन, कीर्तन, ओम नम: शिवायचा गजर शिवालयात दिवसभर सुरू होता.
महादेवाच्या पिंडीला आकर्षक फुलांची सेज करण्यात आली होती. मंदिरांमध्ये प्रसादाचे वितरण, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील पौराणिक मंदिर असलेल्या कल्याणेश्वर, तेलंगखेडी, जागृतेश्वर, पाताळेश्वर, विश्वेश्वर मंदिरांमध्ये रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शन घेतले. शहरातील दहन घाटांवरही महाशिवरात्रीनिमित्त जत्रेचे रूप आले होते.
जागृतेश्वर देवस्थान ट्रस्ट मंदिर – जागनाथ बुधवारी येथील स्वयंभू श्री जागृतेश्वर देवस्थानात साडेसात शिवलिंग आहे. नागपूरनगर देवता म्हणून जागृतेश्वर देवस्थान प्रसिद्ध आहे. पुरातण काळात ग्रामदेवता म्हणून हे देवस्थान ओळखल्या जायचे. ५०० वर्षे जुने हे मंदिर असल्याचे सांगण्यात येते. या मंदिरात साडेसात स्वयंभू शिवलिंग असल्याने महाशिवरात्रीला येथे भाविकांची गर्दी उसळते.
श्री कल्याणेश्वर शिवमंदिर, तेलंगखेडी- सतराव्या शतकातील भोसलेकालीन मंदिर म्हणून तेलंगखेडी येथील श्री कल्याणेश्वर शिवमंदिर प्रसिद्ध आहे. पुरातन आणि जागृत मंदिर असल्याने महाशिवरात्रीला येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. पहाटे ३ वाजता शिवलिंगाचा अभिषेक करण्यात आला.
विश्वेश्वर महादेव देवस्थान – गांधीसागर तलावाजवळील विश्वेश्वर महादेव देवस्थान हे अतिशय प्राचिन मंदिर आहे. २१५ वर्षापूर्वी मंदिराची निर्मिती झाली होती. शिवरात्रीनिमित्त मंदिरात अभिषेक, आरती, भजन, कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कल्याणेश्वर मंदिर, महाल महाल- येथील कल्याणेश्वर शिवमंदिरात रात्री २ वाजतापासून अभिषेकाला सुरुवात झाली. सकाळी ८ वाजता अभिषेक झाल्यानंतर शिवलिंगाला फुलांच्या सेजने सजविण्यात आले. सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.