Published On : Wed, May 23rd, 2018

विदर्भ-तेलंगणा सीमेवर होणारी पशुधन तस्‍करी रोखण्‍यासाठी हंसराज अहीर यांची पोलिस विभागासोबत आढावा बैठक संपन्न

Hansraj Ahir
नागपूर: विदर्भामधील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्‍हयांना लागून असणा-या तेलंगाणा राज्‍याच्‍या सीमेमधून मोठया प्रमाणात गोवंशतस्‍करी होत असून, ती रोखण्‍यासाठी नागपूर व अमरावती विभागाच्‍या पोलिस महानिरिक्षक व संबंधित विभागातील पोलिस अधिक्षकांची बैठक घेऊन त्‍यांना कडक कार्यवाही करण्‍याचे निर्देश आपण दिले असल्‍याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज नागपूर येथे सांगितले. स्‍थानिक रवी भवनमध्‍ये महाराष्‍ट्रातील पशुतस्‍करी रोखण्‍यासंदर्भात कार्यवाहीची आढावा बैठक व गडचिरोलीच्‍या नक्षलग्रस्‍त भागात मोबाईल नेटवर्कसंबंधीची आढावा बैठक घेतल्‍यानंतर प्रसारमाध्‍यमांच्‍या प्रतिनिधीशी संवाद साधतांना ते बोलत होते.

या आढावा बैठकीदरम्‍यान गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, नागपूरचे पोलिस आयुक्‍त डॉ. व्‍यंकटेशम्, नक्षलविरोधी अभियान विभागाचे पोलिस महानिरिक्षक शरद शेलार, सी.आर.पी.एफ. चे उप महानिरिक्षक शेखर, बी.एस.एन.एल. च्‍या मोबाईल नेटवर्किंग विभागाच्‍या महाव्‍यवस्‍थापिका नम्रता तिवारी, नागपूर सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, नागपूर ग्रामीण विभागाचे पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे तसेच नागपूर परिमंडळातील पोलिस उपआयुक्‍त व सबंधित जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक व आर्णीचे आमदार राजु तोडसाम उपस्थित होते.


तेलंगाणामध्‍ये विदर्भ, पश्चिम महाराष्‍ट्र, मध्‍यप्रदेश तसेच खान्देश मधून होणारी पशुधन तस्‍करी रोखण्‍यासाठी पोलिस विभागाला स्‍थानिक वाहतूक विभागाकडून मदत मिळावी, यासाठी आपण सूचना दिल्‍या आहेत. गडचिरोली मधील नक्षलग्रस्‍त भागात मोबाईल नेटवर्कच्‍या क्षमता वाढीसाठी त्‍याचे 4 जी तंत्रज्ञानामध्‍ये अद्यावतीकरण, टॉवर्सची उंची वाढवणे इत्‍यादी संदर्भात आपण बी.एस.एन.एल.च्‍या अधिका-यांना निर्देश दिले आहेत. गडचिरोलीच्या ज्‍या क्षेत्रामध्‍ये टॉवर्स लावण्‍यासाठी अडचणी येत होत्‍या त्‍यादेखील पोलिस यंत्रणेने दूर केल्‍या आहेत. त्यामुळे या परिसरात राहणा-या पोलिस जवान, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान यांना चांगली मोबाईल नेटवर्कची सुविधा यामुळे उपलब्‍ध होईल, अशी माहिती अहीर यांनी यावेळी दिली.

आढावा बैठकीमध्‍ये नागपूर-अमरावती विभागातील वरिष्‍ठ पोलिस अधिकारी, बी.एस.एन.एल.चे वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते.