Published On : Fri, May 29th, 2020

गुरुपुष्पामृत योग : स्वर्ण खरेदीला समाधानकारक प्रतिसाद

Advertisement

नागपूर: स्वर्ण खरेदीचा शुभ योग म्हणून मानल्या जाणाऱ्या गुरुपुष्यामृत योगला नागपुरातील सराफा बाजारात मिळता- जुळता प्रतिसाद मिळाला आहे. असे असले तरी लाॅकडाउनचा प्रभाव स्वर्ण खरेदीवर जाणवत आहे. नेहमी येणाऱ्या गुरुपुष्यामृत योगाच्या तुलनेत यंदा साधारण मात्र सद्य स्थितीनुसार समाधानकारक विक्री झाल्याची प्रतिक्रिया नागपूर सराफा असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे यांनी दिली.

सराफा बाजारात गुरुपुष्यामृत योगावर 24 कॅरेट श्रेणीच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47, 600/- रुपये इतकी नोंदविण्यात आली. दरम्यान सोन्याचे शिक्के आणि हलक्या वजनांच्या दागिन्यांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल आढळून आला. विशेष म्हणजे, बहुतेक सोनारांची दुकाने सुरू झाल्याने परंपरागत ग्राहकांनी ऑनलाईनपेक्षा प्रत्यक्ष दुकानात जाऊन सोने खरेदीला करण्याला महत्त्व दिले.

यासह युवा ग्राहकांचा ऑनलाईन खरेदीकडे ओढा दिसून आल्याची माहिती करण कोठारी ज्वेलर्सचे संचालक कोठारी यांनी दिली. लाॅकडाऊन स्थितीमुळे सर्वच स्तरातील ग्राहकांची आर्थिक स्थिती खालावली असल्याने त्याचा काहीसा परिणाम व्यवसायावर झाला आहे. लाॅकडाऊन उघडल्यानंतर सराफा व्यवसायाला सुगीचे दिवस येण्याची आशा सराफा व्यवसायिकांनी व्यक्त केली.