Published On : Sat, Oct 7th, 2017

विधी अभ्यासकांसाठी न्या.एस.एम.दाऊद दीपस्तंभासारखे मार्गदर्शक – न्या. एस.ए.बोबडे

Advertisement

नागपूर :- चतुरस्त्र प्रतिभासंपन्न तसेच वैचारीक प्रगल्भता असलेले न्यायाधीश एस. एम. दाऊद यांचे कार्य विधीज्ञ, न्यायाधीश तसेच इतरांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलपती एस. ए. बोबडे यांनी केले.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ येथे पहिल्या न्या. एस. एम. दाऊद स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. यावेळी न्यायमूर्ती एस. ए. बोबडे बोलत होते.
याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास शिरपूरकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी, राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजेंदर कुमार, झिम लेबॉरेटीजचे मॅनेजिंग डायरेक्टर अन्वर एस. दाऊद तसेच राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एन. एम. साकरकर उपस्थित होते.

न्या. बोबडे म्हणाले, न्या एस. एन. दाऊद यांची कार्यशैली इतरांना अतिशय प्रभावित करणारी होती. प्रकरणांचा न्याय करतांना अतिशय बारीक निरीक्षणे नोंदवून नि:पक्षपणे ते न्याय देत असत. न्यायप्रक्रियेविषयी त्यांच्या संकल्पना स्पष्ट होत्या. तसेच प्रकरणे योग्यरित्या हाताळण्याची कला त्यांना अवगत होती. सामान्य नागरीक तसेच सर्व समाजातील घटकांना योग्य न्याय मिळावा याकरीता ते नेहमी प्रयत्नरत होते. सेवानिवृत्ती नंतर सुध्दा ते समाजामध्ये कार्यरत होते. इतर सर्व विधीज्ञ, न्यायाधीश, आप्तस्वकीय व सहकाऱ्यांसाठी न्या. दाऊद नेहमीच आदर्श व मार्गदर्शक होते, असे सांगून न्या. बोबडे यांनी नागपूर न्यायालयासोबत जुन्या आठवणी जुळलेल्या असल्याचे सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास शिरपूरकर म्हणाले, विद्यार्थीदशेमध्ये असतांना हुशार विद्यार्थी म्हणून न्या. दाऊद यांची ओळख होती. पूढे वयाच्या तेवीसाव्या वर्षी प्रथमश्रेणीने न्यायाधीश बनून त्यांनी आपल्या हुशारीची चुणूक दाखवून दिली. न्या. एस. एम. दाऊद हे ‘क्विक जज’ असल्याचे न्या. शिरपूरकर यांनी सांगितले. तसेच सहकारी, ज्युनिअर व इतरांना मार्गदर्शन करतांना त्यांची दुरदृष्टी दिसून येत असे. त्यांच्यासाठी सामान्य माणूस अतिशय महत्वाचा होता. ते मानवी हक्काचे खरे समर्थक होते. असे न्या. शिरपूरकर म्हणाले.

न्या. एस. एम. दाऊद यांच्या कुशल कार्यशैलीचे अनेक उदाहरणे सांगून विद्यार्थ्यांनी उच्च पदापर्यंत जाण्यासाठी संयमाने आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणे व ज्ञान संपादन करणे आवश्यक असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी यांनी सांगितले.

यावेळी अन्वर दाऊद यांनी न्या. एस. एम. दाऊद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजेंदर कुमार यांनी तर आभार प्रदर्शन कुलसचिव डॉ. एन. एम. साकरकर यांनी केले.