Published On : Tue, Nov 16th, 2021

पालकमंत्री यांची नक्षल चकमकीत जखमी झालेल्या जवानांची दवाखान्यात जाऊन भेट

Advertisement

गडचिरोली : जिल्ह्यातील कोटगुल ग्यारापत्ती जंगलात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या जवानांच्या तब्येतीची आज नागपूर ऑरेंज सिटी रुग्णालयात जाऊन पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्मीयतेने विचारपूस केली.

या नक्षलविरोधी कारवाईत रवींद्र नैताम, सर्वेश्वर आत्राम, महारू कुडमेथे आणि टिकाराम मथांगे हे गडचिरोली पोलिसांच्या सी_६० पथकातील चार जवान जखमी झाले होते. तर जवानांनी केलेल्या कारवाईत २६ जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. आज या जखमी जवानांची विचारपूस केल्यानंतर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीही त्यांनी संवाद साधला. हे चारही जण लवकरच पूर्ण बरे होतील, असा विश्वास डॉक्टरानी एकनाथ शिंदे यांचेशी बोलताना व्यक्त केला.

गडचिरोली पोलिसांच्या या कारवाईमुळे नक्षलवादी चळवळीला मोठा तडाखा बसला असून नक्षलवाद्यांविरोधातील कठोर कारवाई यापुढेही सुरूच राहील असे यावेळी पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले.

गडचिरोली जिल्हयात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून नक्षलवादाकडे वळू पाहणाऱ्या तरुणांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले.