Published On : Sat, Aug 1st, 2020

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती (जन्मशताब्दी) व लोकमान्य टिळक पुण्यतिथी (शताब्दी स्मृती ‍दिन) निमित्त मनपा तर्फे विनम्र अभिवादन

नागपूर : “जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी” अशी परखड भूमिका मांडणारे, शाळेत न जाताही स्वत: विचाराने सुशिक्षित असणारे, पोवाडे लोकनाटय, कादंब-या, कथा संग्रह इ. साहित्याव्दारे समाजातील अंधश्रध्दा, जातीयता, साठेबाजी, सावकारी, वेठबिगारी विरुध्द ज्यांनी आयुष्यभर लढा दिला, असे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष.

आज शनिवार (१ ऑगस्ट) रोजी नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील दालनात कार्यकारी महापौर श्रीमती मनीषा कोठे यांनी नगरीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन ‍विनम्र अभिवादन केले.

तसेच “स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे…..” हा नारा देवून इंग्रजी जुलमी राजवटीविरुध्द लढा देणारे अग्रणी नेतृत्व, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शताब्दी स्मृती दिनानिमित्त मनपा मुख्यालयात त्यांच्या प्रतिमेला कार्यकारी महापौर श्रीमती मनीषा कोठे यांनी माल्यार्पण करुन नगरीच्या वतीने आदरांजली दिली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, महेश मोरोणे, सहा. आयुक्त्त महेश धामेचा आदी उपस्थित होते.