Published On : Tue, Nov 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

दिवाळीत सलग चार दिवस सुट्ट्या द्या; मुख्यमंत्री फडणवीसांकडे कर्मचारी महासंघाची मागणी

Advertisement

दिवाळीत सलग चार दिवस सुट्ट्या द्या; मुख्यमंत्री फडणवीसांकडे कर्मचारी महासंघाची मागणी

नागपूर : दिवाळीच्या काळात शासकीय कर्मचाऱ्यांना सलग चार दिवस सुट्ट्या मिळाव्यात, यासाठी ९ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी घोषित करण्याची मागणी नागपूर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने केली आहे. महासंघाचे अध्यक्ष संजय थोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन या मागणीवर अनुकूल निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.

यंदा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये केवळ ९ नोव्हेंबर हा दिवस कामकाजाचा असल्याने कर्मचाऱ्यांची अडचण होण्याची शक्यता आहे. ८ नोव्हेंबरला रविवार आणि लक्ष्मीपूजन, १० नोव्हेंबरला बलिप्रतिपदा, तर ११ नोव्हेंबरला भाऊबीज असल्याने सार्वजनिक सुट्टी आहे. मात्र, ९ नोव्हेंबरला शासकीय कार्यालये सुरू राहणार आहेत.

शासकीय सेवेत असलेले अनेक कर्मचारी आपल्या कुटुंबापासून दूर राहून नोकरी करतात. दिवाळी सणासाठी त्यांना मूळ गावी जाण्याची इच्छा असते. अशा परिस्थितीत एका दिवसाच्या कार्यालयीन कामकाजासाठी लांबचा प्रवास करून पुन्हा कामावर परतणे खर्चिक आणि त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सणाचा आनंद कुटुंबीयांसोबत घेता यावा, यासाठी ९ नोव्हेंबरची सुट्टी जाहीर करावी, अशी भूमिका महासंघाने मांडली आहे.

ही मागणी मान्य झाल्यास ८ ते ११ नोव्हेंबरदरम्यान कर्मचाऱ्यांना सलग चार दिवस सुट्ट्या मिळतील. त्यामुळे दिवाळीच्या सणासाठी गावी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. आता मुख्यमंत्री आणि राज्य सरकार या मागणीला हिरवा कंदील देणार का, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.