
मुंबई– महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात महत्त्वाचा निर्णय घेत फडणवीस सरकारने एका शासन निर्णयाद्वारे (जीआर) विधानसभा व विधानपरिषदेत पक्षांचे मुख्य प्रतोद आणि प्रतोद असलेल्या आमदारांना कॅबिनेट व राज्यमंत्रिपदाचा दर्जा प्रदान केला आहे. या निर्णयामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसच्या ४ आमदारांसह सत्ताधारी पक्षातील एकूण ६ आमदारांना ‘लाल दिवा’ मिळाला आहे.
या जीआरनुसार भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) या पक्षांच्या एकूण १६ आमदारांना मंत्रिपदासमान दर्जा देण्यात आला आहे. यामध्ये काँग्रेसचे अभिजीत वंजारी, राजेश राठोड, शिवसेना (उबाठा) पक्षाचे सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांचा समावेश आहे.
१० टक्के सदस्यसंख्येचा निकष
विधानसभा व विधानपरिषदेत ज्या पक्षांची एकूण सदस्यसंख्या किमान १० टक्के आहे, त्या पक्षांच्या मुख्य प्रतोदांना कॅबिनेट दर्जा आणि प्रतोदांना राज्यमंत्री दर्जा देण्याचा निर्णय २०१७ मध्ये तत्कालीन सरकारने घेतला होता. १४ वी विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर २०२१ मध्ये त्याबाबत नवा जीआर काढण्यात आला होता. आता १५ व्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय पुन्हा लागू करण्यात आला आहे.
कोणाला किती सुविधा?
मुख्य प्रतोदांना २५ हजार रुपये, तर प्रतोदांना २० हजार रुपये प्रतिमाह मानधन दिले जाणार आहे. मुंबई अधिवेशनासाठी अनुक्रमे २५ हजार व २० हजार रुपये वाहन भत्ता, तर नागपूर अधिवेशनात विभागीय आयुक्तालयाकडून वाहन व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.
याशिवाय अधिवेशन काळात विधानभवनात कार्यालय, दूरध्वनी सेवा, एक स्वीय सहायक, एक लिपीक-टंकलेखक आणि एक शिपाई अशा सुविधा देण्यात येणार आहेत.
मुख्य प्रतोद आणि प्रतोदांची यादी-
भाजप-
विधानसभा — मुख्य प्रतोद : रणधीर सावरकर
विधानपरिषद — मुख्य प्रतोद : प्रसाद लाड
शिवसेना (शिंदे गट)
विधानसभा — मुख्य प्रतोद : रमेश बोरणारे
विधानपरिषद — मुख्य प्रतोद : मनीषा कायंदे
राष्ट्रवादी काँग्रेस-
विधानसभा — मुख्य प्रतोद : चेतन तुपे
विधानपरिषद — मुख्य प्रतोद : (घोषणा अपेक्षित)
विरोधी पक्ष
काँग्रेस-
विधानपरिषद — मुख्य प्रतोद : अभिजीत वंजारी
प्रतोद : राजेश राठोड
शिवसेना (उबाठा)-
विधानपरिषद — मुख्य प्रतोद : अनिल परब
प्रतोद : सुनील शिंदे
या निर्णयामुळे सत्ताधारी व विरोधक दोन्ही गटांतील प्रतोदांना प्रशासकीय सुविधा आणि राजकीय वजन मिळणार असून, विधिमंडळातील कामकाजावर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.








