Published On : Fri, Mar 23rd, 2018

भ्रष्टाचार व कायदा सुव्यवस्थेवरची चर्चा टाळण्यासाठीच सत्ताधाऱ्यांनी पळ काढला ! विखे पाटील यांचा आरोप


मुंबई: सत्ताधारी पक्षानेच सभागृहाचे कामकाज बंद पाडण्याची नवीन प्रथा सुरु करुन, स्वतःचे अपयश झाकण्याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्न आहे. भ्रष्टाचार आणि कायदा सुव्यवस्थेवर कोणतीही चर्चा सभागृहात सरकारला होऊ द्यायची नसल्यामुळेच सत्ताधारी पक्षांनी सभागृह बंद पाडल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

विधानसभा अध्यक्षांविरोधात विरोधी पक्षांनी दाखल केलेला अविश्वास ठराव चर्चेला न आणता सत्ताधारी पक्षाने आज विश्वासदर्शक ठराव सभागृहात मांडून गोंधळात तो संमत करुन घेतला. या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी सरकारच्या या कृतीवर कडक शब्दात टीका करुन सरकारनेच संसदीय परंपरा आणि प्रथांना काळीमा फासला असल्याचा आरोप केला. विरोधी पक्षाची चर्चेची तयारी असतानाही सरकार पक्षाने सभागृहातून पळ काढणे म्हणजे स्वतःचे अपयश झाकण्याचाच प्रकार आहे. यापूर्वी अशी घटना कधीही घडली नव्हती याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सभागृहात घडलेल्या घडामोडींची माहिती देताना विखे पाटील म्हणाले की, ५ मार्चला आम्ही अध्यक्षांविरोधात आम्ही अविश्वास ठराव दाखल केला.१४ दिवसांच्या मुदतीमध्ये हा ठराव सभागृहाच्या कामकाजपत्रिकेवर येणे अपेक्षित होते. याबाबत सभागृहात दोनवेळा आम्ही मागणी करुनही हा अविश्वास ठराव कामकाज पत्रिकेवर येऊ दिला नाहीच उलट अधिकार नसतानाही मुख्यमंत्र्यांनीच आम्ही योग्यवेळी मांडू असे सांगितले होते. मात्र आज मुख्यमंत्र्यांनीच कार्यक्रम पत्रिकेवर कोणताही उल्लेख नसताना विश्वास ठराव मांडून तो काही अवधीत संमत करुन घेतला यासाठी त्यांनी २००६ सालचा संदर्भ दिला पण विरोधक चर्चा करायला तयार असतानाही सत्तारुढ पक्षानेच सभागृहात गोंधळ घातला. तुमच्याकडे जर बहुमत होते तर मग सभागृहातून पळ का काढला ? असा सवालही विरोधी पक्ष नेत्यांनी उपस्थित केला.

सभागृहातील प्रथा आणि परंपरांना काळीमा फासण्याचा हा प्रकार दुर्दैवी असून सभागृहातील कामकाजही सत्ताधारी पक्षांनी आज उरकून घेतले. वास्तविक विरोधी पक्षाचा २९३ च्या ठरावाची चर्चा सभागृहात सुरु होती. कायदा, सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराबाबतची चर्चा सरकारला होऊच द्यायची नव्हती यामुळेच सभागृहातील कामकाज सत्ताधारी पक्षानी जाणीवपूर्वक बंद पाडले असले तरी अद्यक्षांविरोधात आम्ही दाखल केलेला अविश्वास ठराव अजूनही कायम असून सोमवारी हा ठराव कार्यक्रम पत्रिकेवर घ्यावा अशी मागणी विधानसभा सचिवांकडे आम्ही केली असल्याचे विरोधी पक्षनेते म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट
विधानसभा अध्यक्षांविरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावरून घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी आज राज्यपालांची भेट घेऊन सत्ताधारी पक्षाच्या विरोधात तक्रार केली.

राज्यपालांच्या भेटीसाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आ. जयंत पाटील, आ. नसीम खान, आ. सुनिल केदार, आ. आसिफ शेख, आ. भाऊसाहेब कांबळे, आ. वैभव पिचड, आ. नरहरी झिरवाळ, आ. काशिराम पावरा, आ. राहुल बोंद्रे, आ. त्रिंबक भिसे, आ. अमर काळे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. संग्राम थोपटे, आ. अब्दुल सत्तार, आ. प्रदीप नाईक, आ. विजय भांबळे, आ. जयकुमार गोरे आदी उपस्थित होते.