Published On : Tue, Sep 3rd, 2019

राज्यपाल विद्यासागर राव यांचा राजभवन येथे निरोप समारंभ; नौदलातर्फे देण्यात आली मानवंदना

Advertisement

मुंबई : महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यकाल पूर्ण करीत असलेले राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांना आज (दि.3) शासनातर्फे राजभवन येथे भावपूर्ण निरोप देण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यासागर राव यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला तसेच त्यांचे आभार मानले. राज्यपालांच्या पत्नी विनोदा यांना देखील यावेळी पुष्पगुच्छ देण्यात आला.

राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमानंतर लगेचच राज्यपाल सपत्नीक हैद्राबादकडे रवाना झाले.

या छोटेखानी निरोप सोहळ्याला महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, पोलीस आयुक्त संजय बर्वे, प्रधान सचिव राजशिष्टाचार नंदकुमार तसेच इतर वरिष्ठ अधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते.

राज्यपालांकडून जनतेचे आभार
यावेळी राज्यपाल विद्यासागर राव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्व मंत्रिमंडळ सदस्य तसेच राज्यातील जनतेचे त्यांना मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

नव्या राज्यपालांचा शपथविधी गुरुवारी
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी निवड झालेले राज्याचे नवे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा शपथविधी गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2019 रोजी संध्याकाळी 6 वाजता राजभवन येथे होणार आहे.