Published On : Tue, Mar 31st, 2020

मुख्यमंत्र्यांसोबत राज्यपालांनी घेतला करोना आव्हान तयारीचा आढावा

Advertisement

करोना व्हायरसच्या गंभीर संकटाला तोंड देण्याचे दृष्टीने राज्य शासन करीत असलेल्या उपाययोजनांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेसह आज राजभवन येथे एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला.

स्थलांतरित लोकांसाठी सुरु करण्यात आलेल्या शिबिरांमध्ये रोगराई पसरू नये यासाठी पुरेशी स्वच्छता ठेवावी, तेथील लोकांच्या निवास, भोजनाची व औषधाची व्यवस्था करावी तसेच कुणीही उपाशी राहणार नाही याची विशेषत्वाने काळजी घ्यावी अशा सूचना राज्यपालांनी यावेळी केल्या. या कामी शासनास सहकार्य करणाऱ्या विविध अशासकीय तसेच सामाजिक संस्थाशी देखील समन्वय राखावा अशी सूचना त्यांनी केली. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करावी अशीही सूचना त्यांनी यावेळी केली.

कामगारांना, विशेषतः बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत कामगारांना तातडीची आर्थिक मदत देण्याबाबत राज्यपालांनी सूचना केली.राज्यातील आरोग्य सेवक, पोलीस तसेच स्वच्छता कर्मचारी यांच्या आरोग्य सुरक्षिततेची देखील पुरेशी खबरदारी घ्यावी असे राज्यपालांनी सांगितले.


स्थलांतरित लोकांच्या भोजन व निवासाची योग्य व्यवस्था करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. अतिरिक्त वैयक्तिक सुरक्षा कीट केंद्राकडून उपलब्ध झाल्यावर आवश्यक त्या लोकांना देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

राज्यात करोना रुग्णांच्या उपचारासाठी केलेली व्यवस्था, रुग्ण तपासणीची क्षमता, विलगीकरणाची सुविधा, व्यक्तिगत सुरक्षेसाठी आवश्यक किट्सची उपलब्धता याबाबत राज्यपालांनी यावेळी माहिती करून घेतली.

बैठकीला पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) संजय कुमार, अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) डॉ. प्रदीप व्यास, अतिरिक्त मुख्य सचिव (कामगार) राजेश कुमार व पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल हे उपस्थित होते.