| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Apr 27th, 2018

  पत्रकारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  मुंबई : पत्रकार हे क्षेत्रीय स्तरावर अत्यंत मेहनतीचे काम करतात. त्यांना काळ-वेळेचं बंधन नसते, प्रसंगी चार-पाच तास थांबावे लागले तरी ते बातमी मिळवितात. पत्रकारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यांच्या घराच्या प्रश्नांबाबतही शासन सकारात्मक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

  आझाद मैदान येथे टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित पत्रकार आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

  मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पत्रकारांना 24 तास काम करावे लागते, यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. ताण तणाव वाढतो. पत्रकारांना सुदृढ आरोग्य लाभण्यासाठी या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे शिबीर फायदेशीर आहे, याचा लाभ सर्व पत्रकारांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच सर्व पत्रकारांना सुदृढ आरोग्य लाभो, अशा शुभेच्छाही दिल्या.

  यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, आमदार राज पुरोहित, डॉ. तात्याराव लहाने, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विमल सिंग, उपाध्यक्ष अतुल कदम, महासचिव विलास आठवले यांच्यासह विविध दूरचित्रवाहिन्यांचे पत्रकार उपस्थित होते.

  या शिबिरात सर्व माध्यमातील पत्रकारांची संपूर्ण आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात येणार आहेत.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145