
मुंबई : नागपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान यांना तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत विकसित करण्यात आलेली जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही शासकीय जमीन केवळ रु. १/- (एक रुपया) नाममात्र दराने ३० वर्षांच्या भाडेतत्त्वावर देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महसूल विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४० अंतर्गत ‘सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे नियम १९७१’ मधील नियम ३५ तसेच दि. २५ जुलै २०१९ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींनुसार ही मंजुरी देण्यात आली आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत विकसित करण्यात आलेली ही शासकीय जमीन श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी यांना ३० वर्षांच्या कालावधीसाठी नाममात्र दराने प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
भाडेपट्टा नूतनीकरणाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना
या निर्णयानुसार, भविष्यात भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानंतर श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानने मागणी केल्यास, शासन निर्णयाच्या नियमांनुसार भाडेपट्टा नूतनीकरण करण्याचे पूर्ण अधिकार नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
शासनाच्या या निर्णयामुळे कोराडी तीर्थक्षेत्र परिसराचा अधिक सुटसुटीत विकास होण्यास आणि भाविकांसाठी विविध सोयी-सुविधा उभारण्यास मदत होणार आहे.




