Published On : Thu, Sep 14th, 2017

सरकार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील नाही – सुनील तटकरे

Advertisement

मुंबई: चंद्रकांत पाटील यांच्या ‘बोगस’ वक्तव्याचा राष्ट्रवादीने केला निषेध कर्जमाफीसाठी अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील बोगस म्हणतात. त्यांच्या वक्तव्यावरून सरकारला शेतकऱ्यांप्रती संवेदना नसल्याचे दिसून येते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास दिरंगाई करण्यासाठीच सरकारने ऑनलाइन प्रक्रिया आणली. कर्जमाफीसाठी आतापर्यंत किती शेतकरी पात्र ठरले? हे सरकारने जाहीर करावे. तसेच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ताबडतोब रक्कमा जमा कराव्यात अन्यथा राष्ट्रावादी काँग्रेस येत्या १ ऑक्टोबरपासून राज्यात तीव्र आंदोलन छेडणार, असा इशारा तटकरे यांनी दिला.

राज्यातील लोड शेडिंगच्या प्रश्नावर बोलताना तटकरे म्हणाले की, आम्ही २०१४ साली सत्ता सोडली तेव्हा वीज उत्पादन आणि वीज मागणी यातील तफावत भरून काढली होती. आताच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यात विजेची टंचाई भासत आहे. देशभरात वाढलेल्या महागाईवरूनही तटकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड ऑईलचे दर कमी झाले असताना देशभरात पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. मुंबईत देशातील सर्वात महागडे पेट्रोल विकले जात आहे. हेच का अच्छे दिन असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्यासह आपण सप्टेंबर महिन्याच्या २८ तारखेला सोलापूर आणि ऑक्टोबरच्या १३ व १४ तारखेला नागपूरचा दौरा करणार आहोत, असे तटकरे यांनी जाहीर केले. ७ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्य कार्यकारणीची बैठक होईल तसेच ८ ऑक्टोबर वकिल व महिल संघटनांची बैठक होईल. १५ ऑक्टोबर रोजी डॉक्टर सेलशी शरद पवार बैठक घेतील, अशी माहिती तटकरे यांनी दिली.

राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील आणि डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे उपस्थित होते.