Published On : Sat, Jan 6th, 2018

भिमा कोरेगाव प्रकरण हे सरकारचे अपयश; मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावाः खा. अशोक चव्हाण

Advertisement

Ashok Chavan
मुंबई: भिमा कोरेगाव प्रकरणात जे काही घडले ते सरकारचे अपयश असून मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

आज टिळक भवन दादर येथे काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले की, भीमा कोरेगाव प्रकरण हे सरकारचं अपयश आहे अशीच सर्वांची भावना आहे. गेल्या तीन वर्षांपासून राज्यात जातीय तणाव निर्माण झालाय. सरकार त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करित आहे. जातीय तणाव निर्माण करणा-यांवर सरकार कारवाई का करित नाही? त्यांना अटक का केली जात नाही? सरकारच्या मुकसंमतीने जाणिवपूर्वक हे सुरु आहे, असा आरोप करून मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी खा. चव्हाण यांनी केली.

काँग्रेस पक्ष राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शिबिरे घेणार असून काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधीच्या काही सभा महाराष्ट्रात झाल्या पाहीजेत अशी नेत्यांची इच्छा आहे. यासंदर्भात प्रदेश काँग्रेस राहुल गांधींना महाराष्ट्रात सभा घेण्याची विनंती करणार आहे अशी माहिती खा. चव्हाण यांनी दिली. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी मोघम आरोप करण्यापेक्षा ज्या नेत्याने त्यांना फोन करून त्यांच्यावर दबाव आणला त्या नेत्याचे नाव मेहता यांनी जाहीर करावे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला देशाचे माजी गृहमंत्री व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. बंटी पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम, सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, पृथ्वीराज साठे, रामकिशन ओझा, राजन भोसले, अभिजीत सपकाळ, प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.