नागपूर : कौशल्य विकास संकल्पनेचा अधिकाधिक लाभ युवक-युवतींना व्हावा या दृष्टीकोनातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कौशल्य विकास केंद्रांचे २० सप्टेंबर रोजी उद्घाटन होणार आहे.वर्धा येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे हे उद्घाटन करण्यात येईल. कौशल्य विकास संकल्पनेचा अधिकाधिक लाभ युवक-युवतींना व्हावा या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलले जाणार आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी अशा एकूण ४७ महाविद्यालयांमधील केंद्रांचा समावेश आहे.
वर्धा येथील स्वावलंबी शाळेच्या प्रांगणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विश्वकर्मा कौशल्य योजनेच्या लाभार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. यावेळी कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्यातील १ हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्व देण्यात आलेले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीला सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी तसेच, युवक- युवतींना कौशल्य विकासाची संधी महाविद्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचे उद्द्घाटन व यशस्वी महिला स्टार्टअप्सचा सन्मान तसेच आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन या दोन महत्वाकांक्षी योजनांचा समावेश या कार्यक्रमात राहणार आहे.