
जळगाव : दिवाळीनंतर सोन्याच्या बाजारात मोठे चढउतार सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वी उच्चांक गाठलेले दर आता झपाट्याने खाली येत असून, लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर खरेदीदारांना सोनं स्वस्तात मिळण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत आज सोन्याच्या किमतींमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
गेल्या २४ तासांत सोन्याच्या भावात तब्बल ₹४,००० ची घसरण झाली आहे. जळगावच्या सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१,२२,५०० वरून ₹१,१८,५०० प्रति १० ग्रॅम इतका खाली आला आहे. काही दिवसांपूर्वीच हा भाव ₹१.३५ लाखांच्या पातळीवर होता, मात्र मागील आठवडाभरापासून दरांमध्ये सतत घसरण होत आहे.
देशभरातील सराफा बाजारातही अशीच परिस्थिती दिसत असून, बुलियन असोसिएशनच्या माहितीनुसार सध्या २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,२०,३८०, २२ कॅरेटचा ₹१,१०,३४८, तर १८ कॅरेटचा ₹९०,२८५ रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. चांदीच्या दरातही मोठी पडझड झाली असून, एक किलो चांदीचा भाव ₹१,४६,३०० वर आला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याचे दर दाबाखाली आले आहेत. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील सकारात्मक घडामोडी, चीनसोबतचा व्यापार तणाव कमी होण्याची चिन्हं आणि गुंतवणूकदारांकडून वाढलेली नफावसुली (Profit Booking) ही सोन्याच्या घसरणीची प्रमुख कारणं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
तसेच, बॉण्ड यील्डमध्ये वाढ आणि भू-राजकीय अस्थिरतेत झालेली घट यामुळे गुंतवणूकदारांचा कल आता शेअर बाजारासारख्या पर्यायांकडे वळला आहे. मात्र, केंद्रीय बँकांची चालू खरेदी आणि जागतिक अनिश्चिततेचा परिणाम लक्षात घेतल्यास सोन्याच्या दरांना काहीसा आधार मिळू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.








