
मुंबई : काही दिवसांपूर्वी सोनं आणि चांदीच्या दराने विक्रमी झेप घेत ग्राहकांना धक्का दिला होता. सोन्याने 1 लाख 32 हजारांचा टप्पा ओलांडला होता, तर चांदी दोन लाखांच्या जवळ पोहोचली होती. मात्र आता दोन्ही मौल्यवान धातूंनी मोठी घसरण घेतली असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या 13 दिवसांत चांदीत तब्बल 25 हजार रुपयांपेक्षा जास्त तर सोन्यात 10 हजार 246 रुपयांची घट झाली आहे. आज सकाळच्या सत्रात गुडरिटर्न्सच्या माहितीनुसार चांदीचा भाव 1 लाख 50 हजार 900 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. तर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 21 हजार 620 रुपये आहे.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 31 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,19,620 रुपये, 23 कॅरेट 1,19,140 रुपये आणि 22 कॅरेट सोनं 1,09,570 रुपयांवर आहे. 18 कॅरेट सोनं 89,710 रुपये आणि 14 कॅरेट सोनं 69,980 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,45,600 रुपये इतका नोंदवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय आणि वायदे बाजारात कर अथवा शुल्क नसल्याने सराफा बाजारातील दरांमध्ये थोडाफार फरक दिसून येतो.
सोन्याच्या किंमतीतील घसरणीमागे सणासुदीच्या काळात मागणीत झालेली घट, नफेखोरीमुळे झालेली विक्री आणि तांत्रिक दृष्ट्या बाजार ‘ओव्हरबॉट झोन’मध्ये पोहोचल्याचा परिणाम दिसून आला. दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाशिवाय जगात भूराजकीय तणाव कमी झाल्याने सोनं सुरक्षित गुंतवणूक म्हणून घेतले जाण्याचं प्रमाण घटलं. परिणामी दोन्ही धातूंच्या किंमती घसरल्या.
यंदा सोन्याच्या किंमतीत 43,091 रुपयांची वाढ नोंदवली गेली. 31 डिसेंबर 2024 रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 76,162 रुपये इतकी होती, जी आता 1,19,253 रुपयांपर्यंत गेली आहे. चांदीच्या दरातही 59,583 रुपयांची वाढ दिसली. मागील वर्षाच्या अखेरीस 86,017 रुपयांवर असलेली चांदी आता 1,45,600 रुपयांवर पोहोचली आहे. तथापि, अलीकडच्या घसरणीमुळे बाजारात काही प्रमाणात स्थिरता निर्माण झाली असून ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

 
			

 

 
     
    





 
			 
			
