नागपूर : गोधनी ग्रामपंचायतीमार्फत चालविण्यात येणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीन वायूची गळती झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर वायूचा प्रादुर्भाव झाल्याने ४० हून अधिक नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवला. त्यांना उपचारासाठी विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे २०० मीटरचा परिसर रिकामा केला. परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.
गळती नियंत्रणासाठी संबंधित यंत्रणांसोबत ओसीडब्ल्यूच्या पथकानेही महत्त्वपूर्ण मदत केली. स्वयंपूर्ण श्वसन उपकरणाच्या साहाय्याने पथकातील कर्मचाऱ्यांनी धोकादायक परिस्थितीत गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले.
दरम्यान, पोलिस, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाच्या पथकांनी घटनास्थळी पाहणी केली. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गळतीचे नेमके कारण आणि बाधित नागरिकांची संख्या याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे.




