Published On : Thu, Dec 7th, 2017

उपद्रव शोध पथकाला द्या अतिक्रमण हटविण्याचा अधिकार

Advertisement

Health Commitee
नागपूर: नागपूर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी शहरात कचरा करणाऱ्या उपद्रव मूल्यांवर वचक ठेवण्याच्या हेतूने उपद्रव शोध पथकाची स्थापना करण्यात आली. यामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना अतिक्रमण हटविण्याचाही अधिकार देण्यात यावा, अशी सूचना वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले यांनी केली.

नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीची बैठक गुरूवारी (ता.७) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडली. सदर बैठकीत ते बोलत होते.

यावेळी उपसभापती प्रमोद कौरती, सदस्य लखन येरावार, विजय चुटेले, सदस्या भावना लोणारे, वंदना चांदेकर, नगरसेवक मनोज सांगोळे, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ.अनिल चिव्हाने, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, हिवताप व हत्तीरोग विभाग प्रमुख जयश्री थोटे प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

या बैठकीत मागील महिन्याच्या सभेच्या कार्यवाहीला मंजुरी देण्यात आली. कनक रिसोर्स मॅनेजमेंट कंपनीला दिलेल्या कंत्राटाबद्दल चर्चा करण्यात आली. कोणतीही प्रक्रिया करण्यापूर्वी समितीला सूचित करण्यात यावे, असे आदेश सभापती चापले यांनी दिले. नगरसेवक मनोज सांगोळे यांनी प्रभागातील स्वच्छता कर्मचारी वाढविण्याबाबत विचारले असता, आरोग्य अधिकारी डॉ. दासरवार यांनी कर्मचारी भरती प्रक्रिया ही प्रगतीपथावर असल्याची माहिती दिली. नगरसेवकांच्या सर्व तक्रारींचे निराकरण त्वरित करण्यात यावे, असे निर्देश सभापती चापले यांनी दिले.

मनपाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या दवाखानाच्या कामकाजाबद्दल चर्चा यावेळी करण्यात आली. डॉक्टर्सचे वेळापत्रक, दवाखान्याची वेळ दर्शनी भागात लावण्यात यावे, असे आदेश सभापती चापले यांनी दिले. हिवताप व हत्तीरोग विभाग प्रमुख जयश्री थोटे यांनी विभागाद्वारे करण्यात येणाऱ्या फवारणीची माहिती दिली. याबाबत बोलताना चापले म्हणाले, १५ दिवसाचे परिपत्रक काढण्यात यावे. प्रत्येक कार्यवाहीची सूचना स्थानिक नगरसेवकांना देण्यात यावी, असे आदेश चापले यांनी दिले.

मनपाद्वारे नियुक्ती करण्यात आलेल्या उपद्रव शोध पथकाबाबतही आढावा यावेळी घेण्यात आला. त्याबाबत माहिती देताना डॉ.दासरवार म्हणाले, एकूण ८७ पैकी ४७ कर्मचारी रूजू झाले आहेत. प्रत्येक झोनमध्ये प्रत्येकी चार असे कर्मचारी सद्यस्थितीत नेमण्यात आले आहे. त्यांच्याकडे पावतीपुस्तक देण्यात आले आहे. त्यामागे कुठल्याही उपद्रवासाठी किती दंड आकारण्यात आला ते देखील नमूद करण्यात आले आहे. पथकांना अतिक्रमण हटविण्याचे अधिकार देण्यात यावे, अशी सूचना सभापती मनोज चापले यांनी केले.

मनपाद्वारे नव्याने घेण्यात येणार असलेल्या मशीन्सबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. मनपाने टाटा ट्रस्ट सोबत केलेल्या सामंजस्य कराराची माहिती आरोग्य अधिकारी डॉ.अनिल चिव्हाने यांनी दिली. यावेळी दहाही झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement