Published On : Sun, Aug 29th, 2021

दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ द्या : ना. गडकरी

Advertisement

भाजपा दिव्यांग आघाडीतर्फे दिव्यांगांचा सत्कार


नागपूर: दिव्यांगांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांचा लाभ दिव्यांगांना मिळवून द्या व त्यांना सन्मानाने जगण्यासाठी मदत करा, अशा सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज भाजपा दिव्यांग आघाडीच्या पदाधिकार्‍यांना केल्या.

भाजपा दिव्यांग आघाडीतर्फे आज मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय पॅरालिंपिक खेळाडूंचा सत्कार ना. गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. ज्या दिव्यांग व्यक्तींनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली अशा दिव्यांगांचा सत्कार यावेळी ना. गडकरी यांच्या निवासस्थानी करण्यात आला. याप्रसंगी जयसिंग चव्हाण, विजय मुनीश्वर, विनय उपासनी प्रामुख्याने उपस्थित होते.

दिव्यांगांच्या कामगिरीची दखल पक्षाच्या आघाडीने घेतली याचा मला अभिमान असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- अनेक योजनांच्या माध्यमातून मनपाने दिव्यांगांना सतत मदत करण्याचा प्रयत्न केला. क्रीडा आघाडीचे यावेळी त्यांनी अभिनंदनही केले. या सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आलेल्या पुढाकारामुळे आयोजकांचे कौतुकही ना. गडकरी यांनी केले.

देशात दिव्यांगांची संख्या 6 टक्के असून या सर्वांना अन्न, वस्त्र, निवारा मिळावा व सन्मानाने जगता यावे यासाठी दिव्यांग आघाडीने प्रयत्न करावा. आवश्यक गरजा पूर्ण झाल्याशिवाय ते खेळात उत्तम कामगिरी कसे करतील, असा प्रश्न उपस्थित करून ना. गडकरी म्हणाले- पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून त्यांना घरे मिळवून द्यावी. विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांगांना आयुष्यात उभे करण्याचा प्रयत्न करावा.