Published On : Fri, Aug 12th, 2022
By Nagpur Today Nagpur News

भविष्याला सकारात्मक दिशा द्यावी – बागुल

नागपूर मध्यवर्ती कारागृहात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजन

नागपूर : कारागृहातील बंदिवानांनी आपल्यातील चांगल्या कलागुणांसह विविध जीवनोपयोगी कौशल्यांचा विकास करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करून भविष्याला सकारात्मक दिशा द्यावी, असे आवाहन माहिती संचालक हेमराज बागुल यांनी आज येथे केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर मध्यवर्ती कारागृहात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

Gold Rate
08 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,01,800 /-
Gold 22 KT ₹ 94,700/-
Silver/Kg ₹ 1,15,800/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महाराष्ट्र कारागृह विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने बंदिवानांसाठी योग प्रशिक्षण तसेच ‘जीवन गाणे गातच जावे…’ या प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. बागुल यांच्या हस्ते झाले. पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे, उप अधीक्षक श्रीमती दीपा आगे, डॉ. अर्चना दाचेवार, समुपदेशक सुनील कुहीकर, योग शिक्षक डॉ. योगेश कुलश्याम, संगीतकार नरेंद्र नाशिककर, युवा शाहीर यशवंत जाधव यावेळी उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आपण या महत्वपूर्ण टप्प्यावर स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या प्रत्येकाचे स्मरण करणे आवश्यक आहे. त्यासोबतच देशाच्या प्रगतीसाठी आपलेही योगदान असावे, यासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा घेतली पाहिजे, असे सांगून श्री. बागुल म्हणाले की, कारागृहातील बंदिवानांनी कारावासाच्या कालावधीत आत्मचिंतन, आत्मपरीक्षण आणि आत्माविलोकन करावे. पुढील आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपल्या व्यक्तिमत्वात आवश्यक असणारे बदल घडवावेत. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक थोर नेत्यांनी कारावासातील वास्तव्यादरम्यान समाज आणि देशाला दिशा देण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याचा इतिहास आहे.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात बंदिवानांनाही सहभागी होता यावे, यासाठी कारागृहात आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे पोलीस उपायुक्त श्री. राजमाने यांनी सांगितले. ते म्हणाले, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपल्या देशबांधवांनी प्राणांची आहुती दिली, जुलमी सत्तेकडून अनेक अत्याचार सहन केले. या इतिहासापासून प्रेरणा घेवून आपणही देशासाठी काहीतरी केले पाहिजे. बंदिवासात असेलल्या प्रत्येकाने आपल्यातील वाईट गुणांचा त्याग करून स्वतःमध्ये सुधारणा करावी. तसेच आपल्या देशाच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन श्री. राजमाने यांनी केले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात शहीद झालेल्या भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यासह रामप्रसाद बिस्मिल आणि अशफाकउल्ला खान यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याची माहिती दिली.

प्रास्ताविकामध्ये श्रीमती डॉ. दाचेवार यांनी कार्यक्रमाची संकल्पना व हेतू विशद केला. मनोरंजनातून जनजागृती, प्रबोधन आणि मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि कारागृह प्रशासनाने हा उपक्रम आयोजित केला असून यामाध्यमातून बंदिवानांचे समुपदेशन, योग प्रशिक्षण आणि प्रबोधन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. के. डांगा यांनी केले. बंदिवानांसाठी यावेळी योग प्रात्यक्षिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित बंदिवानही यामध्ये सहभागी झाले.

Advertisement
Advertisement