नागपूर : मी लेस्बियन असून समाज मला स्वीकारणार नाही, असे १८ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी मुलीने एक चिट्ठी लिहीत आपले वास्तव सर्वांसमोर आणले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे वडील सरकारी नोकरीत आहेत, तिची आई गृहिणी आहे आणि तिचा लहान भाऊ विद्यार्थी आहे. ती बीएच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. रिपोर्ट्समध्ये असे समोर आले आहे की, मुलीने तिच्या चिठ्ठीत समाज स्वीकारणार नाही आणि लग्न केल्यास ती आपल्या पतीला खुश करू शकणार नाही अशी भीती व्यक्त केली होती.
रविवारी दुपारी मुलीचे वडील, आई आणि भाऊ तिला घरात एकटी सोडून कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यानंतरच तिने पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन टोकाचे पाऊल उचलले. जेव्हा तिच्या कुटुंबीयांनी घरी परतल्यावर तिला लटकल्याचे दिसले तेव्हा त्यांनी तिला तातडीने मेयो रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन विठोळे यांनी सांगितले की, त्यांनी मुलीने आत्महत्या पूर्वी लिहिलेली चिट्ठी जप्त केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.