मान्सूनपूर्व आढावा बैठक
नागपूर : जून महिन्यात मान्सूनचे आगमन होणार असून मान्सूनपूर्व कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी यंत्रणांना दिलेत. पूर, साथरोग, वादळ, वीज कोसळणे अशा आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करावा तसेच औषध साठा, मनुष्यबळ, कृषी उपाययोजना या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
बचत भवन सभागृहात झालेल्या या मान्सूनपूर्व आढावा सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, आपत्त्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यावेळी उपस्थित होते.
सर्व विभागांनी आपापसातील समन्वयातून मान्सूनपूर्व कामे तात्काळ पूर्ण करावी. अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. प्रत्येक विभागाने कंट्रोलरुम स्थापन करुन नोडल अधिकारी नेमावा. पूरग्रस्त परिस्थितीचा सामना करण्यासाठी देण्यात आलेल्या साहित्याची नीट तपासणी करुन ठेवावी. तालुकास्तरावर मॉकड्रिल घेण्यात यावे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मिळणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात यावी, यासोबतच धरणामधून पाणी सोडताना जिल्हा प्रशासनाला पूर्वकल्पना देण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत.
प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करण्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, रस्ते दुरुस्ती, तलाव दुरुस्ती, शासकीय व खाजगी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट, शालेय इमारत दुरुस्ती,  मुबलक औषध साठा या कामांना प्राधान्य देण्यात यावे. पावसाळ्यात प्रामुख्याने दुषित पाण्याच्या तक्रारी प्राप्त होतात. पाण्याचे नमुने तपासण्याचे काम संबंधित यंत्रणेने करावे. दुषित जल स्त्रोताची यादी तयार करुन उपाययोजनांसह जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावी असे त्यांनी सांगितले. पावसाळ्यात वीज कोसळून मनुष्यहानी होण्याच्या घटना घडत असतात. तालुकास्तरावर असलेले वीजरोधक यंत्र कार्यान्वित असल्याची खात्री संबंधित तहसीलदाराने करावी.
                                                                                                    मान्सूनसाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याच्या सूचना देऊन जिल्हाधिकारी म्हणाले की, आरोग्य विभागाने मुबलक औषधसाठा उपलब्ध ठेवावा. कृषी विभागाने पर्जन्यमानाची दैनंदिन माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याबरोबरच बियाणे व खतांचा तुटवडा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. जिल्हा परिषदेच्या 11 तलावांची दुरुस्ती करण्यासाठी 1 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून तलाव दुरुस्तीचा प्राधान्यक्रम ठरवून तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
नागपूर शहरात 110 तर संपूर्ण जिल्ह्यात 341 पूरप्रवण भाग आहेत. या ठिकाणी रेड आणि ब्ल्यू मार्किंग करुन यादी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पाठवावी अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यासाठी जागा निश्चित करावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले. 11 मोठे पाटबंधारे प्रकल्प, 12 मध्यम पाटबंधारे प्रकल्प तर 7 लघु प्रकल्प आहेत. लघु प्रकल्पाची दुरुस्ती वेळेपूर्वी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना वारंवार घडतात. वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी विद्युत विभागाने सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी असल्याने असंख्य मजूर व कामगार आपआपल्या गावी परतले आहेत. अशावेळी स्थानिक कामगारांचा शोध घेवून त्यांना शेतीविषयक व अन्य काम करण्यासाठी प्रोत्साहित करावे. शेतीची कामे मजूराशिवाय अडू नये याचे नियोजन कृषी विभागाने करावे, आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त होणाऱ्या संदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी शीघ्र प्रतिसाद दल व कृतीदल स्थापन करण्याव यावे. जिल्ह्यात 70 महसूल मंडळ असून प्रत्येक महसूल मंडळाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात नियत्रंण कक्ष स्थापन करण्यात आला असून नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक 1077 हा आहे. प्रत्येक विभागाने नियंत्रण कक्ष स्थापन करावा. अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी यांनी दिल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी सादरीकरण करुन मान्सूनपूर्व करावयाच्या तयारीची माहिती दिली. या बैठकीत उप विभागीय अधिकारी, तहसीलदार व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
			









			
			