Published On : Mon, Dec 5th, 2022

नागपूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राडा; साहित्याची फेकाफेक, माईक आणि बाकांची तोडफोड

Advertisement

नागपूर जिल्हा परिषदेत नवे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नव्या सभापतींनी कार्यभार सांभाळल्यानंतर आज पहिली सर्वसाधारण सभा वादळी ठरली. सर्व साधारण सभेच्या ठरलेल्या विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा न करताच ते मंजूर केल्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांनी केल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. यावेळी भाजपच्या संतप्त सदस्यांनी सभागृहातील साहित्याची व कागदपत्रांची फेकाफेक करत बाकांचीही तोडफोड केली. या गोंधळात मुख्य विरोधी पक्ष (BJP) असलेल्या भाजपच्या सदस्यांना काँग्रेसचे (Congress) बंडखोर नाना कंभालेंचीही साथ मिळाली, हे विशेष.

जिल्हा परिषदेच्या नव्या कार्यकारिणीने पदभार स्वीकारल्यानंतर आज पहिलीच सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. तसेच अनेक महिन्यांनंतर होत असल्याने अनेक मुद्दे गाजणार असल्याचा अंदाज होता. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी घोटाळे व स्थगितीचा मुद्दा समोर करण्याची रणनिती आखली होती. तसेच पद वाटपातही अनेक ज्येष्ठांना डावलण्यात आल्याने त्यांच्यात तीव्र रोष होता. त्यामुळे या सभेत सत्तापत्र कॉंग्रेसला विरोधक (भाजपा) सह स्वपक्षातील नाराजांचाही सामना करावा लागेल याची कल्पना होतीच. सभेतही याप्रकारेच घडले अन् भाजपच्या विरोधकांना काँग्रेसचे बंडखोर नाना कंभालेंचीही साथ मिळाली.

जिल्हा परिषदेच्या नव्या पदाधिकाऱ्यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर आज पहिलीच सर्वसाधारण सभा पार पडली. अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी विषय पत्रिकेवरील सर्व 1 ते 10 विषय सर्वानुमते मंजूर केल्याचे जाहीर केले. त्यास विरोधी पक्ष नेते आतिष उमरे यांनी आक्षेप घेतले. विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा व्हावी अशी मागणी त्यांनी केसी. परंतु, अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांनी चर्चेला नकार देत सर्व विषय एकतर्फी मंजूर केल्याचे जाहीर करीत सभा गुंडाळली. त्यामुळे संतप्त विरोधकांनी सभागृहातील टेबल, खुर्च्यांची फेकाफेक करीत तोडफोड केली. माइक फेकले, कागपत्रही भिरकावले.