मुंबई: प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथील संचलनात महाराष्ट्राच्या ‘शिवरायांचा राज्याभिषेक’ या चित्ररथाला पहिला पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे चित्ररथकारांचा गौरव केला.
यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई आदी उपस्थित होते.
दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीच्या राजपथावर आयोजित करण्यात येणाऱ्या संचलनात विविध राज्यांचे चित्ररथ सहभागी होत असतात. यंदा महाराष्ट्रातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा या चित्ररथाच्या माध्यमातून दाखवण्यात आला. अत्यंत सुंदर अशा या चित्ररथाला केंद्र सरकारतर्फे प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
प्रसिद्ध कलादिग्दर्शक आणि निर्माते नितीन देसाई यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आलेल्या या चित्ररथाने राजपथ येथे उपस्थित सर्वांचीच मने जिंकली होती. या चित्ररथाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ आणि वीर मुद्रेतील पुतळा उभारण्यात आला होता. त्यामागे काही मावळ्यांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या होता.
अशीच कामगिरी सातत्यपूर्ण होत राहो, अशा शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांनी नृत्य करणाऱ्या मुलींचे व संपूर्ण टीमचे कौतुक केले.










