नागपूर – शहरातील रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या एका आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीचा लोहमार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी जलद कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीचे पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या कारवाईला यश आलं.
रेल्वे स्थानकाच्या विविध प्लॅटफॉर्मवर दोन प्रवाशांचे मोबाईल चोरी झाल्याच्या तक्रारी लोहमार्ग पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. पहिल्या घटनेत बिहारमधील गोलुकुमार रॉय प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर बसले असताना त्यांच्या बॅगेतून मोबाईल चोरी झाला होता. दुसऱ्या घटनेत मध्य प्रदेशातील विदिशा येथील रजीत अहिरवार यांचा मोबाईल प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून चोरीस गेला होता.
या तक्रारींच्या अनुषंगाने लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाने संयुक्त तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर तीन संशयितांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं पंकज रनगीरे, रितेश उर्फ मोनू रनगीरे (मध्य प्रदेश), आणि जी. शंकर कणेशन (तामिळनाडू) अशी आहेत.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेले एकूण पाच मोबाईल हस्तगत केले आहेत. पुढील तपास लोहमार्ग पोलीस करत असून, या टोळीचा आणखी मोठा रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.