Published On : Fri, Sep 21st, 2018

कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जनाला प्रतिसाद

Advertisement

नागपूर: जलप्रदूषण टाळण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने घेतलेल्या पुढाकाराला गणेशभक्त चांगला प्रतिसाद देत आहेत. शहरात ठिकठिकाणी लावलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशीच्या गणेश विसर्जनाच्या दृष्टीने महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने दहाही झोन मिळून सुमारे २५० कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहे. शुक्रवारी तलाव, सक्करदरा तलाव आणि सोनेगाव तलाव येथे गणपती विसर्जनाला पूर्णपणे बंदी असली तरी या ठिकाणी मोठे कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहे. या तलावांमध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.

फुटाळ्यावर ग्रीन व्हिजीलची सेवा
फुटाळा तलावावर वायुसेनेच्या दिशेने होत असलेले गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच व्हावे यासाठी ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे स्वयंसेवक दक्ष आहेत. अगदी पहिल्या दिवसापासूनच ते या तलावावर सेवा देत आहे. मूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना कृत्रिम तलावात गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी विनंती करीत आहेत. निर्माल्य कलशातच निर्माल्य टाकण्यासाठी त्यांचा आग्रह आहे. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार फुटाळा तलावाच्या वायुसेनानगरच्या दिशेने ठेवलेल्या कृत्रिम टँकमध्ये १४ सप्टेंबर रोजी २७१, १५ सप्टेंबर रोजी १६५, १६ सप्टेंबर रोजी ८५ आणि १७ सप्टेंबर रोजी ६१०, १८ सप्टेंबर रोजी ९७, १९ सप्टेंबर रोजी २४४, २० सप्टेंबर रोजी ६२, २१ सप्टेंबरला २०० अशा एकूण १७३४ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. आजपर्यंत याच ठिकाणी १८ टन निर्माल्य संकलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

स्वयंसेवी संस्था देणार सेवा
नागपूर शहरातील विविध पर्यावरणप्रेमी आणि स्वयंसेवी संस्था मनपाच्या खांद्याला खांदा लावून अखेरच्या दिवशी विसर्जन मिरवणूकसमयी सेवा देणार आहे. या स्वयंसेवी संस्थाचे स्वयंसेवक विविध ठिकाणी भाविकांना मार्गदर्शन करतील. निर्माल्य कलशात निर्माल्य दान करण्यासाठी आणि कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करण्यासाठी विनंती करतील. या स्वयंसेवकांना सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी केले आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सहकार्य करा : महापौर
महानगरपालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पूर्वीपासूनच जनजागृती केली आहे. जलप्रदूषण होऊ नये, यासाठी पूर्ण प्रयत्न आहेत. नागरिकांनी कृत्रिम तलावातच गणेश मूर्तींचे विसर्जन करावे आणि निर्माल्य कलशातच निर्माल्य दान करावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले आहे.