नागपूर : गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या ऐतिहासिक टेकडी गणेश मंदिरात आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हालेला आहे. विघ्नहर्त्या गणपतीच्या दर्शनासाठी गुरुवार (२२ जानेवारी २०२६) रोजी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
माघ शुद्ध चतुर्थीला साजरी होणारी गणेश जयंती ही गणपतीच्या जन्मोत्सवाचे प्रतीक मानली जाते. पुराणकथेनुसार, नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यप ऋषींच्या कुळात ‘विनायक’ या नावाने गणेशाचा अवतार झाला, म्हणून ही तिथी विनायकी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी षोडशोपचार पूजा करून तिळमिश्रित गुळाच्या लाडवांचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. कुंदफुलांनी गणेश व सदाशिवाची पूजा केली जाते, तसेच रात्री जागरण केले जात असल्याने या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते.
गणपती हे बुद्धी, विवेक आणि प्रेरणेचे प्रतीक मानले जातात. सर्वसामान्यांशी सहज संवाद साधणारे, विविध कला आणि संस्कृतींना सामावून घेणारे गणपती बाप्पा आबालवृद्धांचे आराध्य दैवत आहेत. पराक्रमी असूनही सौम्य, तेजस्वी असूनही तापहीन असे हे दैवत सर्वांना आपलेसे वाटते.
इतिहासात डोकावल्यास, गोंड राजे बख्त बुलंद शाह यांनी १७०२ साली नागपूर शहराची स्थापना केली. त्यांच्या स्वप्नात गणपती बाप्पांनी दर्शन दिल्यानंतर टेकडीवरील या मंदिराची उभारणी झाल्याची मान्यता आहे. सुमारे २५० वर्षांचा गौरवशाली इतिहास लाभलेले टेकडी गणेश मंदिर हे नागपूरसह विदर्भ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान मानले जाते.
या मंदिरातील गणपती बाप्पांची मूर्ती स्वयंभू असून ती उजव्या सोंडेची व उत्तराभिमुख आहे, जे अत्यंत दुर्मीळ मानले जाते. मूर्तीच्या मागे असलेले शिवलिंग हे या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. काळानुसार मंदिराचा विस्तार होत गेला असून आज हे भव्य धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते.
भाविकांच्या श्रद्धेनुसार, टेकडी गणपती मनोकामना पूर्ण करणारे आणि संकटांपासून मुक्ती देणारे दैवत आहे. त्यामुळे गणेश जयंती, चतुर्थी तसेच इतर शुभदिनी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. दररोज सरासरी पाच हजारांहून अधिक, तर चतुर्थीच्या दिवशी दहा हजारांपेक्षा जास्त भाविक दर्शन घेतात.
मंदिरात दररोज तीन वेळा आरती होत असून प्रत्येक आरतीनंतर भाविकांना मोदकांचे वाटप केले जाते. गणेश जयंतीनिमित्त मंदिर परिसर ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दुमदुमून गेला असून, संपूर्ण टेकडी परिसर भक्तिरसात न्हाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.









