Published On : Thu, Dec 28th, 2017

गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण लवकरच

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या वतीने गांधीसागर तलाव सौंदर्यीकरणाला लवकरच सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती महापौर नंदा जिचकार यांनी दिली. गांधीसागर तलाव सौंदर्यीकरणासंदर्भात गुरुवारी (ता. २८) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात घेतलेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

बैठकीला माजी महापौर प्रवीण दटके, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, धंतोली झोन सभापती प्रमोद चिखले, मनपातील भाजपच्या प्रतोद दिव्या धुरडे, अतिरिक्त आयुक्त आर.झेड.सिद्दिकी, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, अधीक्षक अभियंता दीपक सोनटक्के, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) अनिरूद्ध चौंगजकर, सतीश नेरळ, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजीव जैस्वाल, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी.जांभूळकर प्रामुख्याने उपस्थित होते.

गांधीसागर तलावाकरिता महाराष्ट्र शासनाने २२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचा वापर योग्यरीत्या करण्यात यावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. यावेळी गांधीसागर तलावाच्या सद्यस्थितीचा आढावा महापौरांनी अधिकाऱ्यांकडून घेतला. महानगरपालिकेद्वारे तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावाला गळती लागल्याने त्याची दुर्गंधी पसरत आहे. यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार येत आहे. त्याची दुरूस्ती लवकरात लवकर करण्यात यावी, असे निर्देश प्रवीण दटके यांनी दिले. तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी तयार करण्यात आलेला प्रस्ताव नव्याने सुधारणा करून शासनाकडे पाठविण्यात यावा, असेही निर्देश महापौरांनी दिले. प्रस्ताव तयार झाल्यानंतर मुख्य अभियंता विजय बनगीरवार यांनी त्याठिकाणी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश प्रवीण दटके यांनी दिले.

गांधीसागर तलावाजवळील दुकाने अथवा मालमत्ता याची सर्व माहिती स्थावर विभागाकडून पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश दटके यांनी दिले. तलावात रासायनिक प्रक्रिया करण्यात आली आहे. ती पण तपासून मुख्य अभियंत्यांनी त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दटके यांनी दिले. तलावालगत असलेले बालभवन पाडण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्या प्रस्तावावर चर्चा करण्यात यावी, अशा सूचनाही दटके यांनी केल्या. भाऊजी पागे उद्यानाच्या दुरूस्तीचा प्रस्ताव तयार करण्यात यावा, असे आदेश दटके यांनी दिले. मासेमारीबाबत बोलताना मासोळ्यासंदर्भातील प्रश्न हा मनपाच्या उत्पन्नांचा स्त्रोत आहे. त्याबाबतच्या अंतिम निविदा तपासून मुख्य अभियंत्यांनी पुढाकार घेऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी करावी, असे निर्देशित केले.