नागपुरातील गांधीसागर मर्डर मिस्ट्री : राज्यातील सर्वोत्कृष्ट तपास
नागपूर : गांधीसागर तलावातील हत्याकांडाच्या तपासाला पोलीस महासंचालनालयातून राज्यातील सर्वोत्कृष्ट तपास घोषित करण्यात आले आहे. कोणताही पुरावा नसताना अन् मृताची ओळख पटण्यासारखे कोणतेही चिन्ह नसताना मारेकऱ्यांचा छडा लावून एका गुंतागुंतीच्या हत्याकांडाचा उलगडा केल्याबद्दल लकडगंजचे ठाणेदार नरेंद्र हिवरे आणि त्यांच्या पथकातील सहकाऱ्यांना पोलीस महासंचालकांनी १० हजारांचा रोख पुरस्कार आणि प्रशस्तीपत्रही जाहीर केले आहे.
जुलै २०१९ मध्ये गांधीसागर तलावात दोन पोते आढळली होती. या दोन्ही पोत्यात एका व्यक्तीच्या शरीराचे सात तुकडे आढळले होते. मृतदेह ओळखू येत नसल्याने मारेकऱ्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी जिकरीचे काम ठरले होते. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळी गुन्हे शाखेत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी आपल्या पथकातील सहकाऱ्यांसह तब्बल २८ दिवस तपास केला. या दरम्यान मृताची ओळख पटविण्यासाठी बेपत्ता नोंद असलेल्यांच्या नातेवाईकांची डीएनए चाचणी करून घेतली.
सुमारे ५०० सीसीटीव्ही कॅमेºयांचे फुटेज तपासले अन् अखेर मृत व्यक्ती सुधाकर रंगारी (वय २८, रा. जरीपटका) असल्याचे शोधून काढले. त्याची हत्या करणारे आरोपी राहुल पद्माकर भोतमांगे आणि राहुल ज्ञानेश्वर धापोडकर (रा. तांडापेठ) या दोघांना अटक केली. आरोपींनी हत्या केल्यानंतर तुकडे करण्यासाठी वापरलेले कटर तसेच मृतदेहाचे तुकडे पोत्यात भरून तलावात टाकण्यासाठी वापरण्यात आलेला ई-रिक्षाही जप्त केला.
पोलीस महासंचालनालयातून या तपासाला सप्टेंबर २०१९ चा राज्यातील सर्वोत्कृष्ट तपास घोषित करण्यात आला. त्यानुसार सध्या लकडगंजचे ठाणेदार असलेले नरेंद्र हिवरे आणि एपीआय पंकज धाडगे, नीतेश डोर्लीकर, एएसआय राजेंद्र बघेल आणि संदीप मावलकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना पोलीस महासंचालकांनी १० हजारांचा रोख पुरस्कार आणि प्रशस्तीपत्रही जाहीर केले.
मुंबईत होणार गौरव
या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल हिवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मुंबईत पोलीस महासंचालकांच्या हस्ते गौरव होणार आहे. विशेष म्हणजे, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या तपासाबाबत यापूर्वीच ७५ हजारांचा रोख पुरस्कार देऊन हिवरे आणि चमूला गौरविले होते. २००३ मध्ये हिवरे खापा ठाण्यात ठाणेदार म्हणून कार्यरत होते. त्यांनी त्यावेळी तिहेरी हत्याकांडाचा उलगडा केला होता. त्याहीवेळी त्यांच्या तपासाला राज्यातील सर्वोत्कृष्ट तपास म्हणून गौरविण्यात आले होते. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या तपासाबाबत हिवरे आणि त्यांच्या चमूला हा पुरस्कार देऊन त्यांचे अभिनंदन केले.