Published On : Sat, Jan 11th, 2020

…आणि ना. गडकरींनी सांगितली सांभार वडीची रेसिपी

‘ऑरेंज सिटी फूड प्लाझा’ (खाऊ गल्ली)चे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

नागपूर: अस्सल खवय्या म्हणून ओळख असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खवय्येगीरीसह त्यांच्यातील एक कूकही आज पाहायला मिळाला. निमित्त होते ना. गडकरी यांच्याच संकल्पनेतील महत्वाकांक्षी ‘ऑरेंज सिटी फूड प्लाझा’ अर्थात ‘खाऊ गल्ली’च्या लोकार्पणाचे. गुरूवारी (ता.९) गांधीसागर तलावालगत असलेल्या ‘खाऊ गल्ली’च्या लोकार्पणासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची एंट्रीच झाली ती स्टॉल्स समोरून. त्यांनी एकेका स्टॉल्सची माहिती घेत मंचाकडे कूच केली. मध्येच एका स्टॉलवर सांभार वडी पाहून त्यांनी ती खायला घेतली. सांभार वडी खातानाच त्यांना पुण्याच्या सांभारवडीची आठवण झाली, मग काय, ना. गडकरींनी स्टालधारकाला पुणेरी पद्धतीने सांभार वडी कशी तयार करायची याची रेसिपीच सांगितली. खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सांभार वडीची रेसिपी सांगताना पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या. ना. गडकरी एका खवय्यासह उत्तम कूकही असल्याची प्रचिती आज उपस्थित सर्वांनाच आली.

तत्पूर्वी फित कापून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘ऑरेंज सिटी फूड प्लाझा’ (खाऊ गल्ली)चे लोकार्पण केले. याप्रसंगी महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, धंतोली झोन सभापती लता काडगाये, स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, नगरसेवक विजय चुटेले, नगरसेविका हर्षला साबळे, विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम, जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, नगरसेवक मनोज चापले, भगवान मेंढे, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त राजेश मोहिते, धंतोली झोनच्या सहायक आयुक्त किरण बगडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, माजी महापौर अर्चना डेहनकर, माजी नगरसेवक सुधीर (बंडू) राउत, मनोज साबळे आदी उपस्थित होते.

‘खाऊ गल्ली’ हा नागपूर शहरातील महत्वकांक्षी प्रकल्प आहे. सुधीर (बंडू) राउत स्थायी समिती सभापती असताना या प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली. महाल, चिटणीसपूरा, गंजीपेठ व मध्य नागपूरातील अशा अनेक ठिकाणच्या हॉटेल किंवा रेस्टारेंटमध्ये जाउन जेवण करू न शकणा-या आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांसाठी एक उत्तम दर्जाचे अगदी माफक दरात अन्न मिळावे या हेतूने ‘खाऊ गल्ली’ची संकल्पना मांडण्यात आली. ती संकल्पना आज प्रत्यक्षात उतरत आहे. ‘खाऊ गल्ली’मध्ये स्वच्छता, शुद्ध पाणी याकडे विशेष लक्ष द्यावे, नागपूर शहरातील नागरिकांसाठी हा बहुप्रतिक्षित प्रकल्प आहे. येथील पार्कींगचीही सुविधा उत्तम आहे. सर्व सुविधांनी परिपूर्ण ‘खाऊ गल्ली’ हे येत्या काळात मध्य नागपुरातील पर्यटनाचे मोठे केंद्र ठरणार आहे, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

‘खाऊ गल्ली’मध्ये नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी खासदार निधीमधून शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. परिसरात नेहमी स्वच्छता राहणे आवश्यक आहे. ती फक्त महापालिकेचीच जबाबदारी नसून येणा-या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वच्छता हे आपले कर्तव्य आहे याच भावनेने परिसरात स्वच्छता ठेवावी. ‘खाऊ गल्ली’मध्ये असलेल्या ३२ स्टॉल्सना एकाच ठिकाणाहून गॅस कनेक्शन देता यावे, अशी व्यवस्था करण्याचेही त्यांनी सूचविले.

‘खाऊ गल्ली’ शहराच्या वैभवात भर

नागपूरकरांसाठी बहुप्रतिक्षित ठरलेली ‘खाऊ गल्ली’ शहराच्या वैभवात भर घालणारी ठरणार आहे, असा विश्वास महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केला. ‘खाऊ गल्ली’मध्ये एकूण ३२ स्टॉल्स आहेत. ३२ स्टॉल्ससाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात ७८ जणांनी सहभाग घेतला. लकी ड्रॉ द्वारे ३२ जणांची निवड करण्यात आली. येत्या काळात लवकरच ८ नवीन स्टॉल्स येथे तयार केले जाणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तैनात आहेत. याशिवाय सुरक्षा रक्षकांचीही नियुक्ती केली असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन माजी नगरसेवक सुधीर (बंडू) राउत यांनी केले तर आभार क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले यांनी मानले.

इडली, पाणीपुरी, बटाटेवडा, वडापाव आणि बरंच काही…

लोकार्पणप्रसंगी ‘खाऊ गल्ली’मध्ये विविध प्रकारच्या व्यंजनांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. इडली, पाणीपुरी, बटाटेवडा, वडापाव, सांभार वडी, अंडी, चिकन अशा ना ना प्रकारच्या व्यंजनांच्या स्टॉल्सनी ‘खाऊ गल्ली’ फुलली होती. अगदी २० रूपयांपासून ते २०० रूपयांपर्यंत अनेक व्यंजन ‘खाऊ गल्ली’मध्ये सजले होते.

बुलेट देशी बार्बिक्यू
अमरावतीच्या शशिकांत बिसळकर या तरूणाने ‘बुलेट देशी बार्बिक्यू’ची फ्रेंचायसी ‘खाऊ गल्ली’मध्ये सुरू केली. चिकनसह शाकाहारी व्यंजने आणि समुद्री व्यंजन इथली विशेषता आहे. मुळ अमरावतीच्या असलेल्या बुलेट देशी बार्बिक्यूची शाखा यवतमाळ, अकोला, अमरावती नंतर नागपूरमध्येही सुरू झाली आहे.

सोलापूरी थाट
मुळचे सोलापूरचे असलेल्या व नागपूरमध्ये स्थायीक झालेल्या मुकुंद सापनेकर व मृणाल सापनेकर या दाम्पत्याचे ‘खाऊ गल्ली’मध्ये ‘सोलापूरी थाट’ नावाने स्टॉल लावले आहे. बटाटेवडा, वडापाव, शेंग चटणी, भाग्यश्री चिवडा, डिंक लाडू या सर्वांचा आस्वाद ‘सोलापूरी थाट’मध्ये घेता येईल.

निर्मल साई फूड कॉर्नर

धम्मनगर महिला बचत गटातर्फे निर्मल साई फूड कॉर्नर नावाने स्टॉल ‘खाऊ गल्ली’मध्ये लावण्यात आले आहे. या स्टॉलवर मोमोज् यासह सर्व प्रकारच्या व्हेज-नॉनव्हेज चायनिज व्यंजनांचा आस्वाद घेता येईल.

ओमसाई पावभाजी, पुलाव सेंटर

अश्वीन बांते या तरूणाने आई ज्योती बांते यांच्यासह ओमसाई पावभाजी, पुलाव सेंटर ‘खाऊ गल्ली’मध्ये सुरू केला आहे. या स्टॉलवर पावभाजी आणि पुलाव उपलब्ध आहे.

घुगरे नाश्ता पॉईंट

नागपूरमध्ये पहिल्यांदा वडापाव सुरू करणा-या प्रमोद घुगरे व मुलगा प्रणव घुगरे यांचा घुगरे नाश्ता पॉईंट ‘खाऊ गल्ली’मध्ये उपलब्ध आहे. वडापाव, साबुदाना वडा, सांभार वडी या त्यांच्या स्पेशल व्यंजनांचा आश्वाद या स्टॉलवर घेता येईल.

एगजॅकली

फक्त अंड्यांच्याच व्यंजनांचे ‘एगजॅकली’ हे स्टॉल भक्ती आमटे यांनी ‘खाऊ गल्ली’मध्ये लावले आहे. अंड्यांचे १० ते १५ प्रकारची व्यंजने ‘एगजॅकली’ मध्ये उपलब्ध आहेत. भक्ती आमटे यांना मनपाच्या महिला उद्योजिका मेळाव्यात महिला उद्योजिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

नॉर्थ इंडियन फूड कॅफे

राकेश भोयर या तरूणाने लावलेल्या नॉर्थ इंडियन फूड कॅफे मध्ये छोला पाव, मिसळ स्पोकी पाव, पफ आणि मोमोज या हटके व्यंजनांचा आस्वाद घेता येईल.

व-हाडी व्‍हीलेज, भगवती फूड्स

अस्सल महाराष्ट्रीय व्यंजनांचे अमोल जोशी व तनुश्री जोशी यांचे व-हाडी व्हीलेज व कुमार रेड्डी आणि प्रवीण सोनी यांचे भगवती फूड्स हे ७० प्रकारच्या इडलींचे स्टॉल्सही ‘खाऊ गल्ली’मध्ये आहेत.