पिएलजीए सप्ताह: जिल्हाभरात पोलिस प्रशासनतर्फे शांतता रैली
वाहतुकीवर परिणाम
गडचिरोली। पीपल्स लिब्ररेशन गुरील्ला आर्मी या माओवादी संघटनेने पुकारलेल्या शहीद साप्ताहच्या पहिल्या दिवशी दुर्गम भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. तर शहरी भागात बंदचा प्रभाव दिसून आला नाही. धानोरा, रांगी, मालेवाडा, चातगांव, मुरूमगाव सह नक्षलग्रस्त गावातील व्यवहार ठप्प होते. दरम्यान जिल्हा पोलिसांनी ठीक-ठिकाणी शांतता रैली काढून माओवाद्यांच्या बंदला चोख उत्तर दिले.
जिल्हात दरवर्षी माओवाद्यांकडून 28 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत हा सप्ताह आयोजित करण्यात येतो. या सप्ताहाबाबत काल जिल्हाभरात अनेक ठिकाणी माओवाद्यांची पत्रक ठाकली. सप्ताह दरम्यान माओवाद्यांकडून बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर घातपाती कृत्य घडून येण्याची शक्यता आहे. पोलिस विभाग हि सतर्क असून माओवाद्यांच्या विरोधात नक्षलग्रस्त भागात नक्षल विरोधी अभियान सुरू केले आहे.
बससेवा प्रभावित
शहीद सप्ताहमुळे मंगळवारी कुरखेडा, कोरची, धानोरा, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा व अहेरी तालुक्यात अनेक गावात बाजारपेठ बंद होत्या. एसटी बससह खासगी वाहने हि बंद होती. त्यामुळे प्रवाश्यांना पायपीट करावी लागली. जिल्हा भारातील बस स्थांब्यावर नागरिकांची गर्दी दिसून आली. सुरक्षेचा उपाय म्हणून महामंडळा ने दुर्गम भागात अनेक मार्गाच्या बस फेऱ्या बंद केल्या असून आठवडाभर हि सेवा बंद राहणार असल्याने लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. मानव मिशनच्या बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेला बुट्टी मारावी लागणार आहे. दुर्गम भागातील रस्त्यावर आज दिवसभर वाहनांचा सुकसुकाट दिसून आला. जिल्हा मुख्यालयापासून 18 किमी अंतरावरील चातगाव येथे ही आज बाजारपेठ बंद होती. आज सकाळी खुटगाव रस्त्यावर शहीद माववाद्यांचे पोस्टर सापडले.
शेतीचे कामे बंद
शहीद सप्ताहमुळे आज पहिल्या दिवशी कुरखेडा, धानोरा, एटापल्ली तालुक्यात शेतीची कामे बंद होती. सध्या रोवणीचे काम सुरु असून पीक वाचवण्यासाठी धावपळ करणाऱ्या शेतकर्यांना आज बंदचा फटका बसला. पावसाने दगा दिल्याने जिल्हात शेतकर्यांवर दुबार पेरीणीचे संकट ओढवले आहे. अशातच माओवाद्यांच्या सप्ताहामुळे मजुरीची कामेही बंद असल्याने नागरिकांत चिंता व्यक्त केली जात आहे.
दुर्गम भागातील शाळा बंद
शहीद सप्ताहाच्या पहिल्या दिवशीह आज दुर्गम भागातील जिल्हा परिषदांच्या शाळा कुलूपबंद होत्या. तर अनेक ठिकाणी माजी राष्ट्रपती च्या निधनामुळे खासगी शाळांना सुट्टी जाहीर केल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात शांतता रैली
माओवाद्यांच्या बंदच्या विरोधात जिल्हा पुलिक प्रशासनच्या वतीने आज ठीक-ठिकाणी शांतता रैली काढण्यात आली. या रैलीत नागरिकासह विद्यार्थी सहभागी झाले होते. माववाद्यांचा विकास कामांना विरोध असून हिंसक कारवाया करून जनते मध्ये भीतीचे वातावरण पसरवित आहे. निष्पाप नागरिकांचे खून, शासकीय मालमत्तेचे नुकसान केले जात असल्याने नागरिकांनी त्यंच्या भूलथापाला बळी न पडता पोलिसांना मदत करून शांततेसाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पुलिक अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.