Published On : Fri, Mar 30th, 2018

रेल्वे स्थानकावरील आॅटोचलकात रोष

Advertisement


नागपूर: परवानगी पेक्षा अधिक वाहने (ओला कॅब) राखीव जागेत दिसत असल्याने गुरुवारी दुपारी आॅटोचालकांत संतापाची लाट पसरली. या प्रकरणाची लेखी तक्रार त्यांनी स्टेशन व्यवस्थापकांना दिली. यावरुन उपस्टेशन व्यवस्थापक, आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच ओला कॅब चालकांना तंबी दिली.

मंगळवारपासून नागपूर रेल्वे स्थानकावर ओला कॅब सुरू झाली. उत्तम दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशात आनंद आहे. परंतु खासगी वाहन सुरू होऊन तिसºयाच दिवशी म्हणजे गुरुवारी दुपारी चांगलाच गोंधळ झाला. ओला कॅबला दहा वाहनांची परवानगी दिली आहे. तसेच ड्राप अ‍ॅण्ड गो च्या तिसºया रांगेत पिवळ्या पट्ट्याने मार्किंग करुन त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आली. मात्र, मिळालेल्या परवानगी पेक्षा अधिक वाहन येथे पार्क करुन असतात असा आरोप करुन लोकसेवा प्रिपेड आॅटो चालक मालक आणि टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष अल्ताफ अंसारी, शफिक अंसारी आणि अशफाक खान यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने स्टेशन व्यवस्थापक, आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांना निवेदन दिले. खासगी वाहनामुळे आॅटो चालक बेरोजगार होतील, अशी भीती असल्यामुळे आॅटोचालकांनी सुरूवातीपासूनच ओलाचा विरोध केला. आता तिसºयाच दिवशी असा प्रकार घडल्याने आॅटोचालकात रोष होता.

निवेदन मिळताच उपस्टेशन व्यवस्थापक अनंत रोकडे, उपनिरीक्षक होतीलाल मीणा आणि लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच ओला चालकांना तंबी दिली. परवानगी शिवाय अधिक वाहन पार्क होताना दिसू नये अन्यथा कारवाई केली जाईल, अशा शब्दात ओलाचालकांना ताकिद देण्यात आली. वेळीच रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे आॅटो चालक शांत झाले. मात्र, त्यांच्यातील रोष कायम आहे. शिष्टमंळात दशरथ जहरिले, वसीम अंसारी, प्रवीण बनारसे, पटेल, शेख गफ्फार, मीना आणि शेख इदू यांचा समावेश होता.