
नागपूर : कृषी अवशेष आणि सेंद्रिय कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) निर्मितीला चालना देत शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नागपुरात ‘अन्नदाता ते ऊर्जादाता : विकसित भारतासाठी बायोगॅस आणि सीबीजी विस्तारीकरण’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी (IFGE) यांच्या वतीने रविवार, २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटच्या मिलेनियम हॉलमध्ये ही परिषद होणार आहे.
या परिषदेच्या उद्घाटनाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील विशेष अतिथी म्हणून सहभागी होतील. तसेच साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक डॉ. अतुल खराटे, ऊर्जा तज्ज्ञ व महाजनको/महावितरणचे संचालक विश्वास पाठक यांच्यासह २५ हून अधिक राष्ट्रीय स्तरावरील धोरणकर्ते आणि तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.
विदर्भातील कापूस पऱ्हाटी, तुरीच्या काड्या, सोयाबीन, धानाचा पेंढा आणि ऊस मळी यांसारख्या कृषी अवशेषांचा सीबीजी निर्मितीसाठी वापर करून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध करून देण्यावर परिषदेत भर दिला जाणार आहे. सीबीजी प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या सेंद्रिय खतामुळे रासायनिक खतांवरील खर्च कमी होऊन जमिनीचा पोत सुधारण्यासही मदत होऊ शकते.
याशिवाय, नवउद्योजक आणि प्रकल्प विकासकांना केंद्र व राज्य शासनाच्या योजना, अनुदान, बँक वित्तपुरवठा, आधुनिक तंत्रज्ञान तसेच ऑईल मार्केटिंग कंपन्यांसोबत गॅस खरेदी करार यासंबंधी मार्गदर्शन मिळणार आहे. विदर्भातील कृषी क्षेत्र आणि हरित ऊर्जा उद्योगाला नवी दिशा देण्यासोबतच शेतकऱ्यांना ‘अन्नदाता’ ते ‘ऊर्जादाता’ बनवण्याच्या संकल्पनेला बळ देणे, हा या राष्ट्रीय परिषदेचा प्रमुख हेतू आहे.



