नागपूर : खेळता खेळता चार वर्षीय मुलाने संगणकामधील सेल (बॅटरी) गिळला. शौचावाटे तो बाहेर येईल या समजुतीतून त्याला अज्ञानातून केळ खाऊ घातले. मात्र, सेल बाहेर येण्याऐवजी अन्न नलिकेच्या मुखाजवळ जाऊन फसला. मुलगा अत्यवस्थ झाला. ग्रामीण भागात उपचारानंतर मुलाला नागपुरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथील गॅस्ट्रोएन्ट्रालॉजीचे विभागप्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी मुलाला तपासून विना शस्त्रक्रियेने हा सेल बाहेर काढला.
आनंद राठोड (४ वर्षे) रा. बारी, जिल्ह्या यवतमाळ असे त्या रुग्णाचे नाव. आनंद घरात खेळत असताना त्याच्या हातात संगणकाचा चपटा सेल लागला. सहज तोंडात ठेवला असताना अचानक तो गिळला गेला. सुरुवातीला आई-वडील रागवतील या धाकाने आनंद गप्प बसला. नंतर पोटात दुखायला लागल्याने त्याने आईला सांगितले. घरच्या मंडळीच्या सल्यानुसार केळी खाऊ घातली. परंतु पोटाचे दुखणे वाढल्याने नातेवाईकांनी पुसद येथील रुग्णालयात दाखविले, तेथून यवमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी नागपूरच्या मेडिकलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले.
२४ आॅक्टोबर रोजी मेडिकलच्या बालरोग विभागातून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्ट्रालॉजी विभागात भरती केले. डॉ. गुप्ता यांनी आनंदची तपासणी केली. अन्ननलिकेच्या मुखाजवळ सेल फसल्याचे निदान झाले. या घटनेला तीन दिवस झाल्याने सेल सडून काळ्या रंगाचा झाला. शिवाय, सेलमधील रसायनामुळे आतडीला जखमही झाली होती. यामुळे तातडीने सेल काढणे आवश्यक होते. डॉ. गुप्ता यांनी गुरुवारी ‘डबल बलून एन्डोस्कोप’च्या मदतीने कुठलीही दुखापत न करता सेल बाहेर काढला. आतडीत ‘अल्सर’ झाल्याने आनंदला आणखी काही दिवस उपचार घ्यावे लागणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. अमोल समर्थ, डॉ. नितीन गायकवाड, डॉ. केतकी रामटेके, डॉ. तुषार संकलेचा, डॉ. हरीश कोठारी, सोनेल गट्टेवार, सायमन माडेवार, विकास अंबुलकर, रेखा केणे यांनी सहकार्य केले.
अत्याधुनिक दुर्बिणीचा वापर
ही शस्त्रक्रिया साध्या दुर्बिणीद्वारे शक्य नव्हती. त्यासाठी ‘डबल बलून इंडोस्कोपी’चा आधार घेण्यात आला. ही दुर्बिण अत्यंत अचूकतेने काम करते. पंतप्रधान आरोग्य योजनेंतर्गत मिळालेल्या या वैद्यकीय उपकरणामुळे यापूर्वी देखील अशा शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गरिबांना अत्यंत माफक दरात ही उपचार पद्धती शक्य झाली आहे. – डॉ. सुधीर गुप्ता
