Published On : Tue, Aug 27th, 2019

महिला नगरसेविकांना मिळणार चारचाकी गाडी चालविण्याचे प्रशिक्षण

महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिऱ्हे यांची माहिती

नागपूर: नागपूर महानगरपालिकेतील सर्व महिला नगरसेविकांना चारचाकी गाडी चालविण्याचे प्रशिक्षण मिळणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिऱ्हे यांनी दिली. मंगळवारी महिला व बालकल्याण समितीची आढावा बैठक मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित कऱण्यात आली होती. त्याप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी बैठकीला उपसभापती दिव्या धुरडे, समिती सदस्य विशाखा मोहोड, मनिषा अतकरे, नेहा निकोसे, उपायुक्त रंजना लाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

महापालिकेच्या सर्व झोनमध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून फुड स्टॉल व कॅन्टीन तयार करण्याबाबत यावेळी बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. सर्व झोनचे सहायक आयुक्तांना पत्र पाठवून जागा निश्चित करण्यासाठी सांगण्यात यावे, असे निर्देश सभापती संगीता गिऱ्हे यांनी दिले. समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या रात्र निवारा केंद्राबाबत आढावाही सभापती संगीता गिऱ्हे यांनी घेतला.

विभागामार्फत 8 रात्र निवारा केंद्र सुरू असून रात्र निवारा केंद्राला सदस्यांनी एक दिवस भेट देण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. महिला व बालकल्याण समितीमार्फत आयोजित कऱण्यात येणाऱ्या महिला उद्योजिका मेळाव्याच्या आयोजनासंदर्भातही यावेळी बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

विभागामार्फत ई-रिक्षा वाटप व लाडली लक्ष्मी योजनेची माहिती व सविस्तर आढावा सभापती संगीता गिऱ्हे यांनी अधिकाऱ्यांमार्फत जाणून घेतला. महिला व बालकल्याण समिती सदस्यांचा अभ्यासदौरा आयोजित करण्यासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. पुढील आठ दिवसात अभ्यासदौऱ्याचे स्थान व प्रारूप निश्चित कऱण्याचे निर्देश सभापती संगीता गिऱ्हे यांनी दिले.