Published On : Tue, Dec 9th, 2025
By Nagpur Today Nagpur News

‘चार संपादकांचे चार फोन’… नागपुरात एका महिला डॉक्टरचा लढा अन् पत्रकारितेचा काळा चेहरा!

Advertisement

नागपूर – नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाची धामधूम सुरू असताना एक जुना पण चटका देणारा प्रसंग पुन्हा जिवंत झाला आहे. मेयो रुग्णालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांच्यावर महिला डॉक्टरसोबत गैरवर्तवणुकीचा ठपका विशाखा समितीने ठेवताच दशकापूर्वीची गुप्त ‘ऑपरेशन संपादक कॉल्स’ची गोष्ट पुन्हा चर्चेत आली आहे. आजही ती तितकीच जिवंत, तितकीच त्रासदायक आणि तितकीच लाजिरवाणी.

मेयोमध्ये महिला डॉक्टरसोबत झालेल्या अक्षम्य वर्तनाची तक्रार हातात घेऊन पत्रकार माहिती गोळा करत होते. धाडसाने पुढे आलेली पीडित महिला डॉक्टर—आरोपी म्हणजे विदर्भातील एका वजनदार नेत्याचा मेव्हणा—आणि तक्रार अत्यंत गंभीर. अशा वेळी माध्यमांनी तिच्या पाठीशी उभं राहणं अपेक्षित होतं. पण घडलं त्याच्या उलट.

Gold Rate
10 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,28,100 /-
Gold 22 KT ₹ 1,19,100 /-
Silver/Kg ₹ 1,86,700/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

एकाच दिवसात चार संपादकांचे चार फोन वेगवेगळ्या पत्रकारांकडे गेले. चारही फोनचा आशय तसाच—“ही बातमी घेऊ नका.” ज्या वेळेला लोकशाहीचा चौथा स्तंभ सत्य उघड करण्याची जबाबदारी घेतो, त्या वेळेला हे संपादक बातमी दडपण्याचा उद्योग करत होते. राजकीय दबावाखाली, नात्यांच्या वजनाखाली, जाहीरातींच्या लोभाखाली… सत्याला पुरेपूर गाडण्याचा हा प्रयत्न होता. पत्रकारितेच्या आत्म्यावर झालेला हा विश्वासघात आजही विसरता येणे कठीण आहे.

गैरवर्तनाची तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी डॉक्टरची बदली झाली, पण काही महिन्यांतच राजकीय वरदहस्तातून ते पुन्हा उजळ माथ्याने मेयोमध्ये रुजू झाले. आणि आज पुन्हा त्यांच्यावर नवीन ठपका. म्हणजे दशक उलटलं, सरकारं बदलली, अधिवेशने झाली… पण लक्षात राहतं काय? की राजकीय शक्तीपुढे सचोटीची किंमत किती स्वस्त आहे.

वाचकांपासून सत्य लपवणारे संपादक आजही मोठमोठ्या मंचांवर चातुर्याने चौथा स्तंभ, नैतिकता, लोकशाही यांची व्याख्या सांगताना दिसतात. आणि त्याच वेळी डिजिटल माध्यमांच्या वाढीमुळे वृत्तपत्रांचा अस्त आणखी जवळ येतोय यावर हळहळ व्यक्त करतात. पण या उताराला खऱ्या अर्थानं जबाबदार कोण? वाचकांनी नाही, तर काही संपादकांनी स्वतःच पत्रकारितेचे पाय कापले.

आज महिला डॉक्टर पुन्हा पुढे आली आहे. विशाखा समितीचे निष्कर्ष स्पष्ट आहेत. पण या प्रकरणाने उजेडात आणलेला सर्वात मोठा प्रश्न वेगळाच आहे.जेव्हा सत्य दडपले जाते, जेव्हा सत्ता बातमीवर बसते, जेव्हा संपादक पत्रकाराला थांबवतो, तेव्हा लोकशाही कुठे उरते?

पत्रकारितेचा आत्मा लाखो वाचकांच्या विश्वासावर जगतो. हा विश्वास एकदा मोडला की पुन्हा बांधता येत नाही. आणि त्या चार फोननी हा विश्वास चिरडून टाकला होता. आज पुन्हा तेच नाव, तेच आरोप, तोच राजकीय प्रभाव चर्चेत आला आहे. आणि त्याचबरोबर एक जुनी जखमही उघडी पडली आहे.

या घटनेने फक्त एका डॉक्टरचा नाही.तर संपूर्ण पत्रकारितेचा ‘एक्स-रे’ काढला आहे. आणि या एक्स-रेमध्ये दिसणारी वस्तुस्थिती बेचव, विकृत आणि भयावह आहे. पत्रकारितेचा पाया जिथे ढासळायला लागतो, तिथे लोकशाही लंगडते. आणि आजचा हा प्रसंग त्या ढासळलेल्या पायाची जाहीर कबुली आहे.

या घटनेतून एकच शिकवण सत्य दडपले की इतिहास आपला निकाल देतो.

Advertisement
Advertisement