Published On : Sun, Sep 23rd, 2018

माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांचे रविवारी नागपूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

आठ दिवसांपूर्वी शांताराम पोटदुखे यांना चंद्रपुरातील स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आले. तेथे अर्नेजा हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार केले जात होते. मात्र, त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली.

माजी पंतप्रधान दिवंगत पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात शांताराम पोटदुखे अर्थ राज्यमंत्री होते. तेव्हा मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून पोटदुखे सलग चारवेळा निवडून गेले. अजातशत्रू म्हणून त्यांची ओळख होती. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग होता. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शैक्षणिक विकासात त्यांचे भरीव योगदान राहिले. सुरुवातीला ते पत्रकार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या चंद्रपुरात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

विदर्भाच्या विकासासाठी धडपडणारा नेता हरपला: CM
शांताराम पोटदुखे यांच्या निधनाने विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारा एक महत्त्वाचा नेता आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. पोटदुखे यांनी सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ व सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अभियांत्रिकी, विज्ञान, कला, वाणिज्य, समाजकार्य, विधी महाविद्यालयांचे एक मोठे शैक्षणिक जाळे विणले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन वेळा यशस्वी करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. त्यासोबतच विदर्भातील विविध साहित्यविषयक उपक्रमात त्यांचा सातत्याने पुढाकार होता. सक्रिय राजकारणापासून दूर झाल्यानंतरही ते समाजकारण, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात अखेरपर्यंत सक्रिय होते. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्नशील असणारा एक प्रमुख नेता आपण गमावला आहे, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.

अजातशत्रू व्यक्तिमत्व हरपलं: मुनगंटीवार
शांताराम पोटदुखे यांच्या निधनाने आम्ही अजातशत्रू व्यक्तिमत्व गमावले असल्याची शोकसंवेदना राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. शांताराम पोटदुखे यांनी चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. हे जिल्हे शैक्षणिकदृष्ट्या संपन्न करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. माझे आणि त्यांचे नाते राजकारणापलीकडचे होते. मी लोकसभेच्या दोन निवडणुका त्यांच्याविरोधात लढविल्या. त्यांच्याच सरदार पटेल महाविद्यालयाचा मी विद्यार्थी होतो. मात्र प्रचारादरम्यान त्यांनी नेहमीच माझे कौतुक केले. जेव्हा कधी मी नवी दिल्लीत गेलो तेव्हा त्यांनी मला कधीही इतरत्र थांबू दिले नाही. त्यांच्या निवासस्थानी माझा मुक्काम असायचा. मी त्यांना नेहमी काका म्हणायचो. माझ्या वडिलांचे ते उत्तम मित्र होते.

त्यांनी माझ्यावर मुलासारखे प्रेम केले. राजकीय मतभेदाच्या भिंती बाजूला सारून त्यांनी नेहमीच कौतुकाची आणि आशीर्वादाची थाप त्यांनी माझ्या पाठीवर ठेवली. त्यांच्या निधनाने राजकिय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. परमेश्वर त्यांच्या पुण्यात्म्याला शांती देवो अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी पोटदुखे यांना श्रद्धांजली वाहिली. पोटदुखे यांच्या निधनामुळे एक अनुभवी आणि नि‌ष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशी भावना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.